PeepingMoon Exclusive: ‘योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेद्वारे अभिनेता चिन्मय उदगीरकरचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण!

By  
on  

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीरकर लवकरच कलर्स मराठी वरील 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेचा सहनिर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेचा सहनिर्माता म्हणून 'पिपिंगमून मराठी'ला दिलेल्या एक्सक्लुझिव मुलाखतीत अभिनेता आणि सहनिर्माता चिन्मय उदगीरकर म्हणतो की, "सहनिर्माता असल्यामुळे कामाचा व्याप जास्त आहे. त्यामुळे खूपच लक्ष देऊन काम करावं लागतं आहे. निर्माता म्हणून पडद्यावरील कलाकारांसोबतचं पडद्यामागील अनेक गोष्टीत लक्ष द्यावं लागतं. पण या सगळया प्रोसेस मधुन खुप काही शिकायला मिळतं आणि यातून खूप आनंदही मिळतो आहे." असं त्याने सांगितलं.

 

"आमच्या घरी आधीपासूनच महाराजांची सेवा करतात. तसेच घरात आणि मित्रपरिवारात महाराजांचे विचार फॉलो केले जातात. त्यामुळे शंकर महाराजांची सेवा करण्याचं मनात होतं. मग कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील सगळे लेखक, दिग्दर्शक एकत्र येऊन आम्ही हा शंकर महाराजांवर कलाकृती करण्याचा विचार मांडला. मग चॅनेलने काही जुजबी गोष्टींची खातरजमा करून या मालिकेसाठी परवानगी दिली. हे सगळं महाराजांना आमच्याकडून करवून घ्यायचं होतं आणि ते करवून घेतलं अशी आमची धारणा आहे." असं चिन्मय म्हणाला.

यापुढे चिन्मय म्हणाला की, "या मालिकेसाठी सहनिर्माता म्हणून काम करत असल्यामुळे या मालिकेत मी सध्या तरी कोणतीच भूमिका करणार नाहीये."

या पुढचा प्रोजेक्ट कोणता असेल? याचं उत्तर देताना चिन्मय म्हणतो की, "ही मालिका सुरू झाल्यानंतर आणि बऱ्यापैकी रुळल्यानंतर या मालिकेच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी घेऊन निर्माता म्हणून मी लवकरच एक सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे." असं तो म्हणाला.

'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेचं दिग्दर्शन बाळकृष्ण तिडके यांनी केलं आहे, तर या मालिकेचे प्रमुख निर्माते म्हणून संजय झनकर यांनी धुरा सांभाळली आहे. 'योगयोगेश्वर जय शंकर' ही संजय झनकर यांच्या 'झनकर फिल्म्स' या निर्मिती संस्थेची मालिका आहे.

Recommended

Loading...
Share