सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ चे पोस्टर रिलीज झाले आहेत. या सिनेमात गश्मीर महाजनी आणि पुजा सावंत मुख्य भूमिकेत आहे. सध्या या सिनेमाची चर्चा सुरु आहे. पण एका वेगळ्याच कारणाने. आर्टिस्ट सचिन गुरव यांनी सिनेमाच्या निर्मात्यांवर मानधन योग्य दिलं नसल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर ‘पीपिंगमून मराठी’ने दिग्दर्शक सौरभ भावे यांच्याशी केलेली एक्सक्लूजिव बातचीत...
या वादाची पार्श्वभूमी सांगू शकाल का?
सौरभ: खरं तर या प्रकरणावर थेट भाष्य मी करू इच्छित नाही. यागोष्टीला कारणही तसंच आहे. कारण हा विषय निर्माता आणि सचिन यांच्यातील आहे. सचिनला माझ्याबाबत काही खटकलं असतं तर नक्कीच त्याने त्यावर मत व्यक्त केलं असतं. पण हे प्रकरण केवळ मानधन या बाबीशी निगडीत नाही तर याला आणखीही काही कंगोरे आहेत. पण या सगळ्याबाबत निर्माते आणि सचिनच अधिक सांगू शकतात. एक दिग्दर्शक म्हणून मी ज्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टशी बांधला गेलो त्याचप्रमाणे सचिनही आहे. अशा वेळी सचिनच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय आहे किंवा त्याच्या मानधनाबाबत मला काहीही कल्पना नाही.
मानधनाबाबत किंवा कॉन्ट्रॅक्टबाबतचा वाद असलेली प्रकरणं मराठी सिनेसृष्टीत अलीकडेच समोर येत आहेत. तुम्ही कलाकार म्हणून याकडे कसं पाहता?
सौरभ: कॉन्ट्रॅक्टशी संबंध असलेल्या प्रकरणांमध्ये असे वाद अनेकदा दिसून येतात. पण सचिनच्या प्रकरणात मी हे सांगू शकतो की त्याचा वाद सिनेमाशी नाहीये. तर निर्मात्यांशी आहे. त्यामुळे मी यावर फारसं बोलू शकत नाही. निर्मात्याशी कॉन्ट्रॅक्ट असलेल्या व्यक्तीसोबत दिग्दर्शक म्हणून माझं काम आहे हे मी करतो.