सैफ अली खानची वाटचाल चोखंदळ अभिनेता होण्याकडे आहे. जवानी जानेमन हा सिनेमा पाहताना हे वारंवार जाणवतं. सैफ या सिनेमात जसविंदर उर्फ जॅजच्या व्यक्तिरेखेत आहे. मध्यमवयीन असलेला जॅजला पार्टी करण्याचं जणू व्यसन आहे. या सिनेमात एक टीनएजर मुलगी टिया तिच्या पोटातील बाळाचा जैविक वडील शोधत असते. यानंतर काही दिवसांनी जॅजची भेट टिया (अलाया) शी होते. आपल्या स्वभावाप्रमाणे जॅज तिच्याशीही फ्लर्ट करू पाहतो. पण त्याला कळतं की टिया त्याची मुलगी आहे. जी 21 वर्षांपुर्वी एका वन नाईट स्टॅण्डमुळे झालेली असते.
दिग्दर्शक नितीक कक्करने या सिनेमात बाप-लेकीच्या नात्याच्या एक वेगळाच पैलू मांडला आहे. या सिनेमातून डेब्यु करत असलेली अलाया स्वत:ला रॉकिंग अंदाजात सादर करण्यात यशस्वी झाली आहे. सैफ जॅजच्या व्यक्तिरेखेत पुरेपूर सामावून गेला आहे.
वडिलांना शोधणारी टीनएजर टिया आलायानेही उत्तम रंगवली आहे.
या दोघांच्या केमिस्ट्रीमध्ये चार चांद लावले आहेत ते तब्बूच्या अदकारीने. तब्बू यात टियाच्या आईच्या भूमिकेत आहे. अनन्या असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. योगा आणि मेडिटेशनची आवड असलेली अनन्या कथेत वेगळीच टेस्ट आणते. सैफने टिया त्याच्या आयुष्यात येण्यापुर्वीचा अभिनय आणि टिया आल्यानंतरचा एका बापाचा अभिनय उत्तम साकारला आहे.
एका मॅच्युर्ड डिव्होर्सी महिलेच्या व्यक्तिरेखेत कुब्रा सैतने रंग भरले आहेत. याशिवाय फरीदा जलाल, चंकी पांडे, कुमुद मिश्रा, रमीत संधू आणि किकू शारदा यांनीही त्यांच्या वाटेला आलेली भूमिका उत्तम साकारली आहे.
हा सिनेमा तुम्हाला कोणताही आदर्शवाद शिकवत नाही.
बाप आणि मुलीच्या नात्याची, एका कुटुंबाची एक वेगळीच परिभाषा यात दिग्दर्शकाने मांडली आहे. त्यामुळे हटके अनुभव घेऊ इच्छिणा-यांनी हा सिनेमा जरून पाहावा. पीपिंगमून मराठी या सिनेमाला देत आहे 3.5 मून्स.