By  
on  

‘हेलिकॉप्टर ईला’ची सुपरमॉम काजोल काय म्हणतेय, मराठी सिनेमाबद्दल जाणून घ्या

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवणारी सुपरस्टार काजोल नेहमीच विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करते. अनेक सुपरहिट सिनेमे देणारी काजोल दिलवाले या रोमॅंटिक सिनेमानंतर ब-याच कालावधीने हेलिकॉप्टर ईला या हटके सिनेमाद्वारे आईच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. यानिमित्ताने मराठी पिपींगमून डॉट कॉमने नुकतीच एक्सक्ल्युझिव्हरित्या काजोलची भेट घेतली. या भेटीदरम्यान काजोलने मनसोक्त गप्पा मारल्या आणि प्रश्नांवर दिलखुलास उत्तरं देखील दिली आणि तिसुध्दा चक्क मराठीमध्ये.

हेलिकॉप्टर ईलाहे नाव सिनेमाला देण्यात आलं आहे, नेमकं काय आहे यामागचा उद्देश?

काजोल: ‘हेलिकॉप्टर ईला’ म्हणजे, ही एका आईची गोष्ट आहे. हेलिकॉप्टर जसं आपल्या डोक्यावर सारखं भिरभिरत असतं, त्याप्रमाणे आईसुध्दा मुलांच्या मागे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी भुणभुण करत फिरते. अभ्यास कर, इकडे नको जाऊ-तिकडे जा, हे खाऊन जा, तसं नको करूस म्हणून तशीच ही ईलासुध्दा आहे. तीसुध्दा आपल्या मुलावर प्रचंड प्रेम करते आणि त्याच्या मागे मागे फिरते. म्हणूनच या सिनेमाला गमतीशीर असं, ‘हेलिकॉप्टर ईला’, असं हटके नाव देण्यात आले आहे. ती तुमच्या-माझ्यासारख्या प्रत्येक आईची गोष्ट आहे. पण माझ्या मते, काही गोष्टींमध्ये आपण मुलांनासुध्दा स्वातंत्र्य द्यायला हवं, त्यांनासुध्दा त्यांच्या चांगल्या वाईटाची जाण असते.

‘हेलिकॉप्टर ईला’ सिनेमा निवडताना कोणती समीकरणं डोक्यात होती, का?

काजोल: हा सिनेमा निवडताना खरंच माझ्या डोक्यात काहीच समीकरणं नव्हती. मी कधीच समीकरणं जुळवून सिनेमा करत नाही. मला वाटतं, फिल्म मेकिंग या बिझनेसमध्ये कुठलंही सांगितलेलं भाकित अद्यापतरी खरं ठरलेलं नाही. मला जे सिनेमे करावेसे वाटतात तेच फक्त मी करते. मला ‘हेलिकॉप्टर ईला’ या सिनेमाची कथा वाचताच क्षणी प्रचंड भावली. यात सर्वच आहे, विनोद आहेत, खळखळून हसणं आहे, एक संदेश आहे. जे सांगायाचं ते अगदी सहज-सोप्या आणि सरळ मार्गाने प्रेक्षकांना सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या सिनेमाद्वारे केला आहे.

आज एकट्या आईसाठी मुलाला सांभाळणं किती शक्य आहे ?

काजोल: आईच्या महत्वकांक्षा आणि स्वत:च्या कारकिर्दीसाठी जाणीव करुन देणा-या मुलाची ‘हेलिकॉप्टर ईला’ ही गोष्ट आहे. फक्त तु माझ्या मागे लागू नकोस स्वत:कडेसुध्दा लक्ष दे, असं हा मुलगा आईला समजावतो. आई-मुलाचं भावनिक नातं सिनेमात उलगडताना तुम्ही पाहाल. पण खरं सांगायचं झालं तर माझ्या मते मुलांची जबाबदारी घेणं पालकांचे दोघांचही कर्तव्य आहे. आजच्या जगात एकट्याने मुलाला वाढवणं ही खुप मोठी कठीण गोष्ट आहे. एका आईची जितकी जबाबदारी आहे, तितकीच बाबाचीसुध्दा आपल्या मुलासाठी जबाबदारी आहे. ‘हेलिकॉप्टर ईला’मध्ये जी आई आहे, ती एकटी आहे. त्यामुळे ती आईसुध्दा आणि बाबासुध्दा आहे. मुलगा आईच्या पाठीशी खंबीर उभा आहे,तर आई मुलाला सर्वस्व मानते. सिनेमात एक फारच अप्रतिम सीन आहे. ज्यात मुलगा आपल्या आईला एक कार्ड दाखवतो, एकीकडे त्याचा फोटो आहे, दुसरीकडे आईचा फोटो आहे तर वडिलांच्या फोटोच्याजागी आरसा ठेवला आहे. फारच हद्यस्पर्शी सीन असल्याचे तुम्हाला सिनेमा पाहताना जाणवेल.

 तुम्ही मराठी सिनेमे पाहता का?

काजोल: नाही. मी फक्त माझ्या आईचे सिनेमे पाहते आणि खरं सांगायचं झालं, तर मी जास्त सिनेमेच पाहत नाही. मला सिनेमांपेक्षा पुस्तकं वाचायला जास्त आवडतात. त्यामुळे मराठी-हिंदी असं सिनेमांचं वर्गीकरण माझ्यासाठी करायला, नको.

 तुमच्या आई तनुजाजींनी पितृऋण सिनेमाद्वारे मराठी सिनेमांत दमदार पुनरागमन केलं, अजयजींनी विटू-दांडू या मराठी सिनेमाची निर्मिती केली, तुम्ही कधी आता मराठी सिनेमात येताय?

काजोल: नक्कीच. एखादी चांगली कथा असेल आणि वाचल्याबरोबर ती मनाला भिडणारी असेल तर मी नक्कीच काम करेन. सिनेमासाठी भाषेला महत्त्व देण्यापेक्षा मी ते कथानकाला देईन. जे मला मनापासून करावसं वाटतं, ते मी नेहमी करते. त्यामुळे एखादा सिनेमा मला करावासा वाटला तर मी तो करणारच.  

 

 तुम्हाला असं वाटतं नाही का, की घर आणि मुलांमुळे तुम्ही तुमच्या सिनेमाच्या कारकिर्दीपासून जरा दूर गेला आहात?

काजोल: अजिबातच नाही. कुटुंब हे माझं प्रथम प्राधान्य आहे. इतर गोष्टी त्यानंतर येतात. मला मुलं आवडतात. माझ्या दोन्ही मुलांचं त्यांच्या जन्मापासून ते आता त्यांच्या शिक्षणापर्यंत सर्व काही आम्ही आई-वडिल मिळून केलं आहे.  त्यांना चालायला मी शिकवलंय, त्यांना मी स्वत: जेवण भरवलंय, त्यांचा अभ्यास मी घेते, ते जे काही माझ्यासमोर उभे आहेत त्यांना मी घडवलंय, त्यामुळे त्यांच्यासाठी मी माझ्या कारकिर्दीपासून दूर गेले नाही, तर माझी मुलं आणि माझं कुटुंब हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्यापुढे इतर गोष्टी दुय्यम आहेत.

 अजयची घरी कशाप्रकारचे बाबा आहेत, रागीट की लाड पुरवणारे ?

काजोल: हो, अजय घरी एकदम संमिश्र प्रकारचे बाबा आहेत. लाडसुध्दा करतात आणि प्रसंगी रागावतातसुध्दा. माझी मुलगी निसा शिक्षणासाठी सिंगापूरला असते, ती जेव्हा सुट्टीसाठी घरी येते, तेव्हा अजय तिचे प्रचंड लाड करतो. लवकरात लवकर शुटींग संपवून मुलांसोबत वेळ घालवण्याचा अजयचा नेहमी प्रयत्न असतो. आमचा मुलगा युग हा आता सात वर्षांचा आहे. मोठा झाल्यावर तोसुध्दा शिक्षणानिमित्ताने बाहेर जाईल, म्हणूनच आम्ही मुलांसोबतच जास्तीत जास्त वेळ घालवतो. कारण हेच दिवस आहेत ज्यावेळेस पालकांनी मुलांसोबत राहणं आवश्यक असतं.

 सुपरस्टार काजोल सिनेमा निवडताना कशाला प्राधान्य देते, कथेला, दिग्दर्शकाला,निर्मात्याला  की को-स्टारला ?

काजोल: मी प्रत्येक गोष्टीची निवड करताना खुपच विचारपूर्वक निवडक करते. मी यासर्वच गोष्टी नेहमी पडताळून पाहते. मला दमदार कथेसोबतच चांगला दिग्दर्शक आणि चांगला को-स्टार असणं फार महत्त्वाचं वाटतं. कारण या गोष्टी जर जुळून आल्या नाहीत तर तुम्हाला काम करायला मजा येणार नाही, तसंच सिनेमासुध्दा नीट तयार होणार नाही. म्हणून या सर्व गोष्टी माझ्या लेखी फार महत्त्वाच्या ठरतात.

 हेलिकॉप्टर ईलासिनेमा करतानाचा एकूणच अनुभव कसा होता?

काजोल: खुप धमाल आली. आम्ही हा संपूर्ण सिनेमा अगदी हसत-खेळत पूर्ण केला. ‘हेलिकॉप्टर ईला’मध्ये माझ्या मुलाची भूमिका साकारणारा रिध्दी सेन हा अप्रतिम अभिनेता आहे. ‘नागाकिर्तना’ या बंगाली सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. आमच्या दोघांची आई-मुलापेक्षा बेस्ट फ्रेंडसारखी सिनेमात गट्टी जमली आणि प्रत्यक्षसुध्दा आम्ही खुप धम्माल केली. दिग्दर्शक प्रदीप सरकार यांना या सिनेमाचं संपूर्ण श्रेय जातं. उत्तमरितीने या सिनेमाचं सादरीकरण त्यांनी प्रेक्षकांसमोर केलं आहे आणि म्हणूनच प्रदर्शनाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive