By  
on  

‘टेक केअर गुड नाईट’ मनोरंजनासोबतच सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करेल:पर्ण पेठे

‘वाय झेड’,‘फास्टर फेणे’,‘फोटोकॉपी’ या सिनेमामुळे पर्ण पेठे हे नाव मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय झाले आहे. आता ‘टेक केअर गुड नाईट’ या सिनेमात पर्ण पेठे ही महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या सिनेमत सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

“ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा असली तरी सायबर क्राईमसारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्याचे काम करेल”, असे सिनेमाविषयी बोलताना पर्ण म्हणाली.

ती पुढे सांगते, ‘टेक केअर गुड नाईट’ ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. आईबाबा आणि दोन मुले असे हे एक गोड कुटुंब आहे. शाळेमध्ये काही मुले खूप हुशार असतात तर काही मुले खूप दंगेखोर असतात अशाच मुलांकडे सगळ्यांचे लक्ष असते पण अशी काही मुले पण असतात ती खूप हुशार नसली तरी मस्तीखोरसुध्दा नसतात, अशा मुलांचे प्रतिनिधीत्व करणा-या मुलीचीमाझी सिनेमात भूमिका आहे. तिला जास्त लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. म्हणूनच ती मोबाईल किंवा इंटरनेट यांचा आधार घेत असते. एक दिवस चॅटींग करताना अचानक काय गडबड होते. मग तो प्रॉब्लेम सोडवताना कुटुंबाला काय अडचणी येतात याची ही गोष्ट आहे.

सिनेमातील सहकलाकारांसोबतच्या अनुभवाविषयी पर्ण सांगते, “पाहिल्यापासूनच मी इरावती हर्षे यांची चाहती होते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला मिळणे मी भाग्यच समजते. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर हे देखील दिग्गज कलाकार आहेत. सेटवर त्यांच्याकडून तसेच आदिनाथ कोठारे आणि लेखक आणि दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी यांच्या कडून अनेक गोष्टी शिकता आल्या.”

“सायबर क्राईम या विषयाभोवती आपल्याकडे फारच कमी सिनेमे आले आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना आपण अनेकदा आपले पासवर्ड आणि बँकेचे खाते क्रमांक सेव्ह करतो. त्यामुळे आपले पैसे दुस-यांना जाऊ शकतात किंवा आपल्या पर्सनल गोष्टी लिक होऊ शकतात. त्याविषयी आपण सुरक्षितता बाळगणं गरजेचं आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ हा सिनेमा मनोरंजनासोबत तुमचे डोळे उघडण्याचे काम करेल”, असे पर्ण स्पष्ट करते.

या सिनेमाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत लाभले आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेट यांची प्रस्तुती असलेला ‘टेक केअर गुड नाईट’ हा सिनेमा येत्या 31 ऑगस्ट 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive