जॉनने सिनेमात कधीच ढवळाढवळ केली नाही: सुबोध भावे

By  
on  

भय आणि उत्सुकता निर्माण करणारा ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याची पहिली मराठी निर्मिती असलेला हा सिनेमा आहे, हे विशेष. सुबोध भावे, राकेश बापट या कलाकारांसोबतच तृप्ती तोरडमल ही ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता सुबोध भावेला जेव्हा जॉन अब्राहमब याच्यासोबत सिनेमा करण्याचा अनुभव कसा होता, हे विचारण्यात आलं तेव्हा, सुबोध म्हणाला “ जॉन ‘सविता दामोदर परांजपे’च्या मुहूर्ताला सेटवर आला होता. त्यानंतर त्याने फक्त दोन ते तीन वेळाच सेटवर हजेरी लावली. एकदा सिनेमा दिग्दर्शकाकडे सोपवला की त्यात ढवळाढवळ करायची नसते हे तो चांगलं जाणून आहे आणि यातूनच त्याच्या मनाचा मोठेपणा दिसून आला. त्याने स्वप्नाताईच्या कामात कधीच लुडबूड केली नाही. त्याने त्याला जे वाटतंय ते नक्की सांगितलं आणि फक्त मार्गदर्शन केलं. तसंच सिनेमा एडीट होऊन फायनल झाल्यानंतर त्याने प्रत्येकाला वैयक्तिकरित्या फोन किंवा मेसेज करुन पहिली प्रतिक्रिया दिली.”

जॉनच्या मोठ्या मनाबद्दल सुबोध पुढे स्पष्ट करतो, “ जॉन अब्राहम खरंच एक गुणी आणि सज्जन माणूस जसा असतो तसाच तो कलावंत आहे. त्याने सातत्याने उत्तम सिनेमे नेहमीच करावेत, अशी आम्ही सर्व आशा करतो व आम्हीसुध्दा त्याच्या सिनेमाचा एक भाग असावा, असं आम्हाला वाटतं.”

 

‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट यांच्यासोबतच अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदी कलाकारांच्यासुध्दा सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित आणि ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ प्रस्तुत ‘सविता दामोदर पराजंपे’ हा मराठी सस्पेन्स-थ्रीलर सिनेमा येत्या 31 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Recommended

Loading...
Share