अभिनेता जॉन अब्राहमची निर्मिती असलेला ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भय, उत्सुकता आणि प्रेमकथा असा त्रिकोणी संगम साधणा-या सिनेमाची सर्वत्रच चर्चा सुरू आहे. अभिनेता सबोध भावे आणि अभिनेत्री तृप्ती तोरडमल यांच्यासह हिंदीसोबतच मराठीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता राकेश बापट या सिनेमात महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत झळकतोय.
‘सविता दामोदर परांजपे’ सिनेमाच्या शुटींग दरम्यान घडलेला एक रंजक किस्सा नुकताच राकेशने एका मुलाखती दरम्यान शेअर केला. राकेश म्हणतो,“आम्ही या सिनेमाचं शुटींग करताना प्रचंड एन्जॉय केलं. एखाद्या कुटुंबाप्रमाणे आम्ही हसत-खेळत शुट पूर्ण केलं. पण महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा थोडाफार भयपटाकडे झुकणारा असल्याने आमचं बरंचसं शुटींग रात्री शेड्यूल करण्यात यायचं. मढ आयलंडला एका निर्मनुष्य बंगल्यात आमचं बरचसं शुटींग पार पडलं. पण तिथे तृप्तीला पाहून अनेकदा भिती वाटायची. ती भूमिकेत इतकी समरसून जायची की शॉट ओके झाल्यावरसुध्दा ती नुसती समोर जरी आली तरी एक क्षण असं खरंच वाटायचं ही तृप्ती नाहीच. पण तो भास असायचा. ”
भीती वाटण्याबाबतच राकेश पुढे सांगतो, “मला ख-या आयुष्यातसुध्दा कधी भिती वाटत नाही. मी ब-याचदा ट्रेकिंगला जातो. मला रात्रीचं ट्रेकिंग करायला फार आवडतं. एकदा असंच ट्रेकिंग करत असताना कोणीतरी अदृश्यपणे बाजूने गेल्याचा भास झाला होता तेवढंच.”
सिनेमातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना राकेश म्हणाला, “ अशोक ही व्यक्तिरेखा मी ‘सविता दामोदर परांजपे’मध्ये साकारतो आहे. त्याच्यात एक अदृश्य शक्ती पाहण्याची अद्वितीय क्षमता आहे. त्याला या जोडप्याच्या आयुष्यात नेमकी कुठली अडचण आहे, हे चांगलं गवसलंय आणि त्याला कसं सामोरं जायचं हेसुध्दा अशोक व्यवस्थित जाणतो. सिनेमात या व्यक्तिरेखेमुळे शेवटपर्यंत रहस्य घेऊन जाण्याची ताकद आहे. तुम्हाला सिनेमा प्रचंड आवडेल. सविता दामोदर परांजपे हा सिनेमा म्हणजे एक दर्जेदार कलाकृतीच आहे, असं म्हणावं लागेल”
वृदांवन या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या राकेश बापटचा हा दुसरा सिनेमा. मराठी पिपींगमूनतर्फे राकेशला खुप खुप शुभेच्छा. स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा येत्या 31 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.