सध्या सगळीकडे चर्चा आहे ती अक्षय कुमारच्या ‘केसरी’ची. सारागढीच्या लढाईवर आधारित असलेल्या सिनेमामध्ये अक्षय कुमारची मुख्य भूमिका आहे. अक्षय मुळातच बॉलिवूड्चा ‘अॅक्शन मॅन’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या सिनेमाच्याबाबत त्याचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्यासाठी पीपिंगमूनने केलेल्या बातचीतचा सारांश.
या सिनेमातील व्यक्तिरेखेसाठी कोणती तयारी केली होती?
उत्तर: मी सिनेमाच्या व्यक्तिरेखेसाठी स्वत:ला कोंडून घेणारा किंवा एकटा राहणारा अभिनेता नाही. माझी भूमिका कशी असावी याचं संशोधन करण्याचं काम मी दिग्दर्शकावर सोपवतो. मी फक्त उत्तम अभिनय करायचा आहे हे समजून सेटवर जातो.
प्रत्येक सिनेमा काहीतरी शिकवत असतो. तुम्ही केसरी सिनेमातून काय शिकलात?
उत्तर: केसरीने मला शहिदांची किंमत करायला शिकवलं. शहिदांविषयी आदराची भावना आधीपासून मनात होतीच. पण केसरीमुळे हा आदर दुणावला असं म्हणायला हरकत नाही. या सिनेमातील एका दृश्यात एका तरुण सैनिकाला गोळी लागते. अशा वेळी आयुष्याचे अवघे काही क्षण उरले असताना त्याच्या मनात काय भावना असतील. याचा विचार करून मी शहिदांसमोर कायमच नतमस्तक होत असतो.
‘भारत के वीर अॅप’बद्दल काय सांगाल?
उत्तर: या अॅपने जमा केलेला निधी हा थेट कुटुंबियांपर्यंत जातो. सरकार किंवा इतर कोणत्याही मंत्रालयाची मध्यस्थी त्यात नसते. पुलवामा शहिदांच्या प्रत्येकाच्या घरीही निधी दिला गेला आहे. काहींच्या घरी जाऊनही निधी दिला आहे. आता या अॅपद्वारे आम्ही दिव्यांग शहिदांसाठी काही करता येतं का ते पाहणार आहे.
अक्षयजी तुम्ही ग्लॅमरस सिनेमांसोबत प्रादेशिक (रिजनल)सिनेमेही निर्माण केले आहेत. रिजनल सिनेमांकडे तुमचा कल कसा वळला?
उत्तर: रिजनल सिनेमांची मला आवडणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशय घनता. याबाबत मी मराठी सिनेमांचा उल्लेख करेन. मराठी सिनेमे आशयघन असतात. त्यामुळेच मला मराठी सिनेमांच्या निर्मितीचा मोह आवरला नाही. मी दोन मराठी सिनेमे प्रोड्युस केले आहेत. खरं तर माझी मराठी सिनेमांशी नाळ जोडलेली आहेच पण मराठी नाटकंही मी आवर्जून पाहतो. मी ‘आधार’ नावाच्या एका मराठी सिनेमात कॅमिओही केला आहे. येत्या काळातही एक मराठी सिनेमा निर्मितीच्या विचारात आहे. पण उत्तम स्क्रिप्ट असेल तर त्यात कामही करेन.