सेंट लॉरेन्सच्या कॉलेजात अडमिशन घेतलेला आणि कॉलेज जीवनातील झगमगाटात मोठ्या आत्मविश्वासाने वावरणारा ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ चा नायक अर्थातच टायगर श्रॉफ हा त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात नेमका कसा स्टुडंट होता, कॉलेजात मुलींना इम्प्रेस करण्याचे त्याचे काही फंडे होते का, किंवा तो फक्त एक अभ्यासू मुलगा होता, हे जाणून घेण्याची तुम्हा-आम्हा सर्वांनाच उत्सुकता आहे.
टायगर हा करण जोहरचा नवा स्टुडंट प्रेक्षकांच्या कसा अधिराज्य गाजवतोय याची कल्पना आपल्याला नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरवरुन आलीच असेल. पण या कॉलेज स्टुडंटच्या भूमिकेविषयी बोलताना टायगरने एक खास उलगडा मुलाखतीत नुकताच केला आहे आणि तो वाचल्यावर तुम्हीसुध्दा नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.
सिनेमातील भूमिकेविषयी बोलताना टायगर म्हणतो, “ ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ हा माझ्यासाठी ‘बागी’सारखा सिनेमा अजिबातच नव्हता ज्यासाठी पडद्यावर धडाकेबाज अॅक्शन करण्यासाठी भरपूर मेहनत किंवा सरावाची गरज होती. ह्यात फक्त एक महत्त्वाचं होतं की एका कॉलेज स्टुडंटप्रमाणे मला वागायचं आणि दिसायचं होतं. माझ्या आत्तापर्यंतच्या अॅक्शन सिनेमांपेक्षा हा सिनेमा माझ्यासाठी विशेष आहे. पण खास गोष्ट तर ही आहे, की मी ख-या आयुष्यात कधी कॉलेजलाच गेलो नाही. त्यामुळे माझ्यासाठी हा सिनेमा म्हणजे कॉलेजचं आणि एका सामान्य तरुणाचं आयुष्य जगण्याची एक सुवर्णसंधीच होती. एका कॉलेज स्टुडंटच्या रुपात प्रेक्षकांसमोर हुबेहुब दिसावं यासाठी बरेच आटोकाट प्रयत्न करावे लागले आहेत व ह्यातूनच कॉलेज जीवन नेमकं कसं असतं ते मला ह्या सिनेमाच्या सेटवरच समजलं.”
कॉलेजला न जाण्याचं कारण स्पष्ट करताना टायगर सांगतो, “शाळेनंतर मला लगेचच ‘हिरोपंती’ ह्या सिनेमाची ऑफर मिळाली होती. ह्या सिनेमाची पूर्वतयारी करण्यासाठी जवळपास एक-दीड वर्ष गेलं आणि त्यानंतर ‘हिरोपंतीचं शूटींग सुरू झालं, त्यामुळे माझं कॉलेज म्हणजे ‘हिरोपंती’चं सेटच होतं.”
आत्तापर्यंत फक्त अॅक्शन आणि टिपीकल हिरोवाल्या भूमिकेत दिसणारा टायगर 'स्टुडंट ऑफ द इयर 2’चा नायक साकारताना खुपच उत्साही असल्याचं पाहायला मिळालं. टायगर श्रॉफ सह अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोन डेब्यूटंट अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
https://www.instagram.com/p/BwEX9mdnkzX/
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला 'स्टुडंट ऑफ द इयर 2’ हा सिनेमा येत्या 10 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.