बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी आज 11 ऑगस्टला 57 वर्षांचे होत असले तरी आजही त्यांचा रूबाब आणि स्टाईल एखाद्या हिरोसारखीच आहे. फिटनेसला महत्त्व देणा-या नायकांमध्ये सुनील शेट्टी हे नाव आवर्जून घ्यावं लागतं. ‘मोहरा’, ‘गोपी किशन’, ‘बॉर्डर’, ‘हेरा फेरी’, ‘धडकन’, ‘फिर हेरा फेरी’ यांसारखे हिट सिनेमे त्यांनी दिले आहेत.
दरवर्षी सुनील शेट्टी त्यांचा वाढदिवस लोणावळा येथे संपूर्ण कुटुंबिय आणि खास मित्रपरिवारासह साजरा करतात. एकत्र वेळ घालवतात, क्रिकेट खेळतात आणि भरपूर धम्माल करतात. यंदा त्यांचा वाढदिवस वींकेंडला आला आहे. सध्या ते मढ आयलंड येथे टाटा स्कायसाठी एका जाहिरातीचे शुटींग करत आहेत. 120 दिवसांचा मिशन फिट इंडिया फिटनेस फेस्टिव्हल टाटा स्कायद्वारे लॉन्च करण्यात येत आहे. यावेळी हेल्थ आणि फिटनेससंदर्भात सुनील शेट्टी यांनी पिपींगमूनसह खास बातचित केली.
तुम्ही फिटनेसबाबतीत नेहमीच जागरूक असता, तुमच्या मते याचं महत्त्व काय आहे ?
सुनिल शेट्टी: फिटनेसच माझ्यासाठी सर्वकाही आहे. फिटनेसमुळेच मी सिनमांमध्ये आलो. याचमुळे मला आज कठीण आणि जिवघेणे स्टन्ट्स करता येतात.अनेक निर्माते मला म्हणायचे तुमची बॉडी पिळदार आहे, तुम्ही खलनायक म्हणून जास्त शोभून दिसाल. सुदैवाने माझी अॅक्शन चांगली होती म्हणून मला हिरोच्या व्यक्तिरेखा मिळाल्या. फिटनेस हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. आता मला त्याची खुप सवय झाली आहे आणि त्याशिवाय मी राहू शकत नाही.
पूर्वीच्या फिटनेसमध्ये आणि आता किती बदल झाले आहेत?
सुनिल शेट्टी: हो नक्कीच. आता बरेच बदल झाले आहेत. यात खुपच तंत्रज्ञान आलं आहे. आता फिटनेसबाबतीत लोक जास्त जागरूक झाले असून फिटनेस ट्रेनिंगच्या उपकरणांमध्येसुध्दा बरीच सुधारणा झाली आहे. आजकाल ट्रेनिंगच्या विविध पध्दती, डाएट प्लॅन, न्यूट्रिशियन्स,पर्सनल ट्रेनर यांच्याकडून भरपूर माहिती सर्वांना मिळते. माझ्या मते जर तुम्ही फिटनेसवर लक्ष दिलं ,तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची वेळच येणार नाही किंवा औषधं घ्यावी लागणार नाहीत.
तुम्ही खुप पूर्वीपासून फिटनेसची ट्रेनिंग घेता आहात?
सुनिल शेट्टी: हो. मला क्रिकेट खेळायला खुप आवडतं,मला देशासाठी टीम इंडियामध्ये खेळायचं होतं. म्हणूनच मी फिटनेस ट्रेनिंग खुप पूर्वीपासून घेत आलो आहे. एकदा माझी विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत भेट झाली. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो, सर तुम्ही किती बळकट आणि मजबूत आहात पण तुम्ही तितके फ्लेक्सिबल आहात का, तेव्हा ते मला म्हणाले, बेटा तु कधी मला बॉल हिट करताना पाहिलं आहेस? मी किती कठिण पध्दतीने बॉल मारतो,पाहिलंस, यासाठी खुप हार्ड वेट ट्रेनिंग घ्यावी लागते. त्या भेटीनंतर फिटनेस ट्रेनिंग घ्यायचा मी निश्चयच केला, आणि मग पिळदार शरीर कमावलं.पण कधी क्रिकेट खेळू शकलो नाही.
तुम्ही कधी पॅकेज व्हिटॅमिन किंवा मिनरल सप्लिमेन्ट्स,मसल बिल्डर, टेस्टोस्टोरेन बूस्टर यापैकी काही घेता का?
सुनिल शेट्टी: मला आजपर्यंत यांचा अर्थच कळला नाही, कि हे का घ्यायचे माझ्या मते सप्लिमेन्ट्स तेव्हाच घेतले जातात, जेव्हा शरीरात कशाची तरी कमतरता भासते. घरच्या जेवणातून आपल्याला सर्वकाही मिळतं. जर शरीरात उर्जा कमी असेल तर शरीर तसे संकेत देते. त्याप्रमाणे तुम्ही वर्कआऊट आणि डाएटचं वेळापत्रक बनवू शकता. मी या सप्लिमेन्ट्सपेक्षा आईच्या हातच्या जेवणाला महत्त्व देतो. दूध, सोया मिल्क आणि ब्राऊन राईस यांना मी महत्त्व देतो वजन वाढवणं म्हणजे प्रोटीन घेणं नव्हे, माझ्यासाठी फिटनेस म्हणजेच ज्ञान आहे, मिशन इंडियाचं ध्येयसुध्दा हेच आहे.
तुम्ही एक बॉलिवूड हिरो आणि एक प्रेरणा आहात......
सुनिल शेट्टी: एखादा हिरो प्रत्येकाच्या प्रेरणास्थानी असतो, तसा मीसुध्दा असेन. मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो, तेव्हा धर्मेद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन हे हिरो होते. प्रत्येकाची एक खासियत होती. धर्मेंद्र यांचे मसल्स, अमिताभजींची अॅक्शन, शत्रुघ्न यांचे संवांद तर विनोदजींबद्दल काय म्हणू त्यांच्यासारखा नायक मी आजपर्यंत पाहिला नाही.