अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी सिनेसृष्टीसोबतच आता बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृता नेहमीच स्वत:चं एक स्थान निर्माण करताना पाहायला मिळते. प्रत्येक सिनेमांमधून तिचा सहज सुंदर अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. मेघना गुलजार यांच्या राझी सिनेमाद्वारे आपल्या अभिनयाची जादू दाखविल्यानंतर आता अमृताचा ‘सत्यमेव जयते’ हा सिनेमा स्वातंत्र्यदिनी म्हणजेच येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने या सिनेमाबाबत /marathi.peepingmoon.com सह दिलखुलास गप्पा मारल्या.
सत्यमेव जयतेमधील तुझ्या भूमिकेविषयी सांग?
अमृता: ‘सत्यमेव जयते’ या सिनेमात मी अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ही व्यक्तिरेखा माझ्या ख-या आयुष्याप्रमाणेच एकदम आनंदी असलेल्या स्त्रीची आहे. ज्या कास्टिंग दिग्दर्शकाने मला ‘राझी’साठी निवडलं होतं, त्यांनीच माझी या भूमिकेसाठी निवड केली आहे.
मनोज वाजपेयी याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
अमृता: मी मनोज वाजपेयी यांच्यासोबत काम करण्यास प्रचंड उत्सुक होते. त्यांच्यात प्रचंड उर्जा आहे. त्यांच्यासोबत काम करणं हा एक मजेशीर अनुभव होता.त्यांना भेटण्यापूर्वी इतरांसारखा माझासुध्दा असा समज होता, की ते फार गंभीर स्वभावाचे आहेत.पण त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर समजलं की ते किती उत्साही असतात. आमच्या दोघांची सिनेमातील केमिस्ट्री फार अफलातून जुळून आलीय. आता मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची उत्सुकतेने वाट पाहात आहे.
मनोज वाजपेयी यांच्यासोबत काम करताना कुठला दबाव जाणवला?
अमृता: हो. नक्कीच. त्यांच्यासोबत काम करताना, मला नेहमीच दबाव जाणवत होता. ते एक गुणी आणि सृजनशील अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या सीन्सदरम्यान मी प्रचंड दक्ष आणि एकाग्रतेने काम करायची, आणि याची परिणीती म्हणजे,आमची केमिस्ट्री छान बॅलन्स झाली.
तुम्ही सर्वात जास्त कशाला प्राधान्य देता, सिनेमा की वेबसिरीज?
अमृता: मला अभिनय फार आवडतो. मग ते सादर करण्याचं माध्यमं कोणतंही असो. मी मराठी सिनेसृष्टीतून असल्याने मला नेहमी विचारणा केली जाते, की मराठी सिनेमेच करत पुढे जाणार की हिंदीत लक्ष केंद्रित करणार. पण माझ्यासाठी या गोष्टी तितक्या महत्त्वाच्या नाहीत. टीव्ही, सिनेमा, वेबसिरीज, नाटक सर्वांनाच मी महत्त्व देते. ज्या ज्या प्रकारे प्रेक्षकापर्यंत मला पोहचता येईल, ती सर्व माध्यमं माझ्यासाठी महत्त्वाची ठरतात.
अशी कोणती व्यक्तिरेखा आहे, जी भविष्यात तुला साकारायला आवडेल?
अमृता: अशा भरपूर व्यक्तिरेखा आहेत, ज्या भविष्यात मला साकारायला आवडतील. मला नेहमी विविध व्यक्तिरेखा साकारायला आवडतात. प्रत्येकवेळी पहिल्यापेक्षा वेगळ्या भूमिका करण्यास मी जास्त प्राधान्य देते. माझी ‘राझी’तली व्यक्तिरेखा आणि ‘सत्यमेव जयते’मधील मी साकारत असलेली सरीता या दोन्ही भिन्न भूमिका आहेत. मला फक्त ग्लॅमरस अभिनेत्री व्हायचं नाही, तर प्रेक्षकांना सतत नवीन काहीतरी देत राहायला आवडतं.
‘सत्यमेव जयते’सिनेमासाठी मराठी पिपींगमूनतर्फे चतुरस्त्र अभिनेत्री अमृता खानविलकरला खुप सा-या शुभेच्छा!