पुन्हा एकदा अभिनेत्री क्रांती रेडकरचं दिग्दर्शनात पुनरागमन होत आहे. प्लॅनेट मराठीच्या 'रेनबो' या चित्रपटाचं दिग्दर्शन क्रांती करणार आहे. या आधी क्रांतीने 'काकण' चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. 'प्लॅनेट मराठी' चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर व 'मँगोरेंज' प्रॉडक्शनच्या ह्रिदया बॅनर्जी यांनी 'रेनबो चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
‘रेनबो’ या चित्रपटात प्रसाद ओक, उर्मिला कोठारे, सोनाली कुलकर्णी आणि ऋषी सक्सेना हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमधील बदलत जाणारी कलरफूल जर्नी प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवता येईल.
' रेनबो ' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल अभिनेत्री, दिग्दर्शक क्रांती रेडकर म्हणते की, "प्लॅनेट मराठी ओटीटी मनोरंजनात्मक, संवेदनशील व समाजप्रबोधन करणारे विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. 'रेनबो' च्या निमित्ताने आपण या प्लॅटफॉर्मचा एक भाग होणार आहोत या गोष्टीचा फार आनंद होतोय. माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिल्याबद्दल 'प्लॅनेट मराठी' व अक्षय बर्दापूरकर यांचे आभार. 'काकण' या सिनेमानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा फार उंचावलेल्या आहेत त्यामुळे एक उत्तम गोष्ट असणारा सिनेमा मला बनवायचा होता . सर्वात आधी मी या चित्रपटाची गोष्ट लिहिली आणि नंतर याला साजेसे कलाकार मला मिळाले. हे सर्गळे माझे चांगले मित्र असून ते अतिशय उत्तम कलाकार देखील आहेत. म्हणूनच मी त्यांच्यासोबत काम करायला फार उत्सुक आहे . प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल अशी मला खात्री आहे."