By  
on  

प्रेमाच्या महिन्यात येणार 'लोच्या झाला रे'

अनेक मराठी चित्रपट या नव्या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यातच प्रेमाच्या महिन्यात 'लोच्या झाला रे' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकतील. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

प्रेक्षकांना पोट धरुन हसवण्यासाठी 'लोच्या झाला हे' हा चित्रपट येत्या 4 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून हा धमाकेदार कौटुंबिक चित्रपट तुफान विनोदी असून प्रेक्षकांना पोट धरुन हसवेल यात शंका नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे हे चारही कलाकार पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असून यात नेमका काय लोच्या होणारेय हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. या चित्रपटात विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

 

पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी 'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यापूर्वी पारितोष पेंटर यांनी ‘धमाल’, ‘टोटल धमाल’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे. संजय मेमाणे यांनी 'लोच्या झाला रे’चे छायाचित्रण केले असून त्यांनी याआधी  ‘झिम्मा’, ‘हिरकणी’, ‘हाफ तिकीट’ अशा सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओ प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे.


 
या चित्रपटाबाबत निर्माते नवीन चंद्रा म्हणतात, ‘’आम्हाला हा चित्रपट प्रदर्शित करताना खूप आनंद होत आहे. सध्याची स्थिती पाहता, आताही मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहात आहेत, मराठी चित्रपटांना सहकार्य करत आहेत, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे आणि त्यामुळेच चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचे प्रोत्साहन आम्हाला मिळत आहे. प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. आम्हाला खात्री आहे. ‘लोच्या झाला रे’ चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होईल.’’

Recommended

PeepingMoon Exclusive