किरण माने यांना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढल्यानंतर हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे. यात आता संभाजी ब्रिगेडने देखील उडी घेतली आहे. नुकतच मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मालिकेच्या सेटवर चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच तेथे पोलिसांनी हजेरी लावुन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी कॅमेरे तोडण्याची धमकीही संभाजी ब्रिगेडने दिली होती. किरण माने यांच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सेटवर दाखल झाले होते.
'मुलगी झाली हो' या मालिकेचं सातारा जिल्ह्यातील गुळुंब येथे चित्रीकरण सुरु आहे. याच ठिकाणी जाऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. भुईंज पोलिस वेळीच त्याठिकाणी दाखल झाले.
किरण माने यांना त्यांच्या चूकीच्या वर्तणुकीचं कारण सांगत मालिकेतून काढण्यात आल्याचं स्टार प्रवाह वाहिनीने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं. मात्र आपल्या राजकीय पोस्टमुळे मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा किरण माने यांचा आरोप आहे.
किरण माने प्रकरण आता राजकीय चर्चेचा विषयही झाल्याचं पाहायला मिळतय. शरद पवार यांच्यानंतर किरण माने यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली होती. यात खासदार अमोल कोल्हे आणि स्टार प्रवाह वाहिनीची कन्टेंट हेड सतीश राडवाडे देखील या चर्चेत सहभागी झाले होते.