अभिनेत्री अक्षया देवधरची पर्स चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे. गाडीच्या डिक्कीतून ही पर्स चोरण्यात आल्याचं अक्षयाने एका प्रसिद्ध पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलय. अक्षयासोबत ही घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेली असता तिच्या दुचाकीच्या डिक्कीतील पर्स चोरट्यांनी लंपास केली आहे.
अक्षयाच्या पर्समध्ये यावेळी पाच ते सहा हजार रुपये असल्याचं तिने सांगितलय. अक्षयाने सांगितलय की, "मी आणि माझी मैत्रिण २३ फेब्रुवारीला (काल) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी माझी पर्स मी मैत्रिणीच्या गाडीच्या डिकीतील बॅगमध्ये ठेवली होती. तेथून आम्ही दोघी नाष्टा करण्यासाठी गेलो. काही वेळाने पुन्हा गाडीजवळ आल्यावर डिकी उघडून पाहिल्यावर आतील साहित्य इकडे तिकडे झाल्याचे दिसून आले. त्या बॅगमध्ये पर्स काही दिसून आली नाही. सोबत असलेल्या मैत्रिणीला मी पर्स कुठे गेली असे विचारले. त्यावर तिने घरी राहिली असेल असे उत्तर दिले. नंतर मी घरी येऊन पाहिले तर घरी देखील पर्स नव्हती. पर्स कोणी तरी चोरली आहे हे लक्षात येताच मी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. त्यावर पोलिसांनी हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली."
मात्र ही पर्स परत मिळाल्याचं अक्षया सांगते. पर्स परत मिळाली असली तरी त्यातील पैसे मात्र गायब होते. अक्षया म्हणते की, "दरम्यान दोन मुलांनी एक पर्स पोलिसांकडे आणून दिली. त्या दोघांकडे चौकशी केली असता आमच्या गाडीच्या तिथे पर्स मिळाली असल्याचे सांगितले. त्या पर्समधील कागदपत्र मिळाली. पण त्यातील जवळपास ५ ते ६ हजार रुपये काढून घेण्यात आले. पैसे गेले पण माझी महत्त्वाची कागदपत्र मिळाली आहे. या तपास कामात डेक्कन पोलिसांनी खूप मदत केली आहे त्या सर्वांचे मी आभार मानते"
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अक्षया लोकप्रिय झाली होती. या मालिकेत अक्षयाने पाठक बाई ही भूमिका साकारली होती. सध्या अक्षया ही 'हे तर काहीच नाही' या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करतेय.