'विशू' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. सोशल मिडीयावर हा ट्रेलर चर्चेत आला आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकतायत.
कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.
या चित्रपटाचे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. या बेटावर मोबाईलचे नेटवर्क नसल्याने इतरांशी संपर्कात राहणे कठीण होते. त्यात चित्रीकरण बेटावर आणि बाहेर कलाकरांच्या राहण्याची सोय त्यामुळे बोटीने ये-जा करावी लागत होती. या चित्रपटाच्या टीमला यामुळे अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तरीही या सगळ्यावर मात करत 'विशू'चे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले.
याबाबत गश्मीर महाजनी व मृण्मयी गोडबोले सांगतात की," मालवणमध्ये शूट करताना एक वेगळीच मजा आली. बाजूला इतके निसर्गसौंदर्य असताना काम करण्यातही एक वेगळाच उत्साह असतो. चित्रीकरणासाठी रोज बोटीने बेटावर जाणे, दगदगीचे होते, मात्र त्याचा कधी कंटाळा नाही आला. अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या परंतु या जादुई बेटावर त्या अतिशय नगण्य वाटल्या. चित्रपट पाहताना प्रेक्षकही या बेटाच्या नक्कीच प्रेमात पडतील.'' तर दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात की, "आपल्या महाराष्ट्रातही निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेली अनेक ठिकाणे आहेत आणि त्यापैकीच एक असलेल्या मालवणातील एका बेटाचा आम्ही चित्रीकरणासाठी विचार केला. 'विशू'च्या निमित्ताने मालवणचे सौंदर्य प्रेक्षकांसमोर येईल. ही एक प्रेमकहाणी आहे, जी मालवणच्या निसर्गसौंदर्यात अधिकच खुलणार आहे.''
येत्या 8 एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होतोय.