‘फुलपाखरु’ या मराठी मालिकेने प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं होतं. या मालिकेतील ऋता आणि यशोमान या जोडीलाही पसंत केलं गेलं. त्यातच यशोमान आपटे आणि आशीष जोशी यांची छान मैत्रीही पाहायला मिळाली. दोघांना संगीताची प्रचंड आवड आहे आणि म्हणूनच ‘फुलपाखरु’ मालिकेचं एक गाणंही त्यांनी एकत्र गायलं होतं. शिवाय दोघं विविध कामांमधून आणि व्हिडीओ साँग करून त्यांच्या गाण्याची आवड जोपासत असतात. आता दोघं पहिल्यांदाच एक व्हिडीओ साँग घेऊन येत आहेत. ‘शुक्रिया’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं दोघांनी एकत्र गायलं असून आशिषने ते लिहीलयं आणि संगीत रचनाही आशिषने केली आहे.
हे गाणं आशिषने फुलपाखरु मालिकेच्या प्रवासासाठी समर्पित केलं होतं. मालिकेच्या शेवटच्या दिवशी हे गाणं त्यानं सेटवर गायलं होतं. हेच गाणं आता व्हिडीओ रुपात आणि एका थिमसह आणलं जात आहे. हे गाणं व्हिडीओ रुपात आणण्याचं नेमकं कारण यशोमान आणि आशिषने पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगीतलय. कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजातील दुर्गम भागातील लहान मुलांसाठी शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या लोकांना हे गाणं दोघांनी समर्पीत केलं आहे. ‘विग्ज फॉर ड्रिम्स’ या संस्थेच्या संपर्कात दोघं आले आणि ते पाहून त्यांना ‘शुक्रिया’ या गाण्याची आठवण झाली.
शहापुरमधील एका छोट्याश्या गावात जिथे विजेची कमतरता आहे अशा ठिकाणी डिजीटल प्रोजेक्टर्सच्या माध्यमातून शिक्षण देण्याचं काम ही संस्था करते. याच सगळ्या गोष्टी पाहून हे व्हिडीओ साँग करण्याचं यशोमान, आशीषने आणि त्यांच्या टीमने ठरवलं. तेथील लहान मुलांचीही भेट त्यांनी घेतली. संगीताची जाण असलेले आणि सामाजिक भान आणि त्याचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणारी यशोमान आपटे आणि आशीष जोशी ही तरुण जोडी आहे. त्यामुळे याचं मिश्रण या गाण्यात पाहायला मिळेल एवढ नक्की.
नुकताच या गाण्याचा टीझरही दोघांनी प्रदर्शित केला आहे. येत्या 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हे गाणं रिलीज करण्यात येईल.