कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर गुढीपाडव्याचा आणि मराठी नवीन वर्षाचा सण घरात बसूनच साजरा केला जातोय. त्यातच मराठी कलाकारही हा सण घरात बसून उत्साहात साजरा करत आहेत.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून बऱ्याच कलाकारांनी त्यांनी घरात उभारलेल्या गुढीचा आणि त्यांचा मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषेतील फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री गायत्री दाताराने एक सुंदर कॅप्शन देत तिचा गोंडस फोटो पोस्ट केला आहे. गायत्री म्हणते की, “देवाजवळ एकच प्रार्थना आहे, हे कोरोनाचं जे वाईट सावट आत्ता जगावर, आपल्यावर आहे त्याचा हसता हसता नाश करता येईल इतकं सर्वांना बळ दे”
अभिनेत्री ईशा केसकरनेही सुंदर फोटो पोस्ट करत सकारात्मक कॅप्शन लिहीलय. ईशा म्हणते की, “कोरोनामुळे का होईना, आपल्याला आपल्या माणसांसोबत वेळ घालवता येतो आहे! ही आपुलकी, हे प्रेम सर्वांच्या आयुष्यात नेहमीच असावं. घरी रहा, आनंदी रहा, काळजी घ्या”
प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेयर केली आणि पत्नी, मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. केदार शिंदे म्हणतात की, “सात जन्म एकत्र रहाण्याच्या आणाभाका घेतल्या... आता तर फक्त २१ दिवसांचा प्रश्न आहे. कामामुळे घरी वेळ देतां येत नाही. ही सबब खुप वेळा दिली. आता स्वत:साठी आणि आपल्याच लोकांसाठी वेळ द्यायचा आहे. आयुष्य खुप सुंदर आहे. पण त्यासाठी जगावं लागणार आहे. छ्त्रपतींचे वंशज म्हणवून घ्यायला तसा संयम, ध्यैर्य आपल्यात असावं लागणार”
तर अभिनेत्री नेहा पेंडसेचा हा लग्नानंतरचा पहिलाज गुढीपाडवा आहे. त्यामुळे पति शार्दुलसोबतचा पारंपारिक वेशभुषेतील फोटो नेहाने पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नेहा म्हणते की, “लग्नानंतरचा माझा पहिला गुढीपाडवा साजरा करणं हेच माझ्यासाठी quarantine आहे, सगळ्यांनी काळजी घ्या, घरात राहा”
या आणि इतर बऱ्याच कलाकारांनी त्यांचे, त्यांच्या कुटुंबियांसोबतचे त्यांनी आनंदाने उभारलेल्या गुढीचे फोटो पोस्ट करत आजच्या दिवशी कोरोनावर वात करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन देणाऱ्या पोस्ट शेयर केल्या आहेत.