By  
on  

लॉकडाउन नंतर अशाप्रकारे होईल मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण, करावे लागेल या नियमांचे पालन

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता यामुळे विविध क्षेत्रांना अडचणींना सामोरं जावं लागत  आहे. कोरोनामुळे मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला  आहे. लॉकडाउनमध्ये सगळ्या प्रकारचं चित्रीकरण बंद आहे, थिएटर्स बंद आहेत. यातच या क्षेत्रात ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहेत. यातच चित्रीकरण सुरु व्हावे यासाठी प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया ही संस्था विविध प्रयत्न करत आहे. सगळे नियम पाळून आम्ही चित्रीकरण करु असे आश्वासनही त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहेत. नुकतच प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडियाने ट्विट करुन या मागण्या पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. शिवाय  लॉकडाउन नंतर चित्रीकरण सुरु करण्यात आले तर कोणत्या नियमांचं पालन करावे लागले आणि ते केलं जाईल याविषयीची माहितीही पोस्ट केली आहे. यात फिल्म आणि टेलिव्हिजनसाठी काही महत्त्वाच्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. या नियमावलीचा तपशील त्यांनी ट्विटसोबत जोडला आहे. यामध्ये चित्रीकरण करत असताना क्रू मेम्बर्सची काळजी, स्वच्छता याविषयीच्या गोष्टी आहेत. कमीत कमी लोकांचा वापर करुन हे चित्रीकरण करण्यात यावे या प्रकारचे नियम यात आहेत. शिवाय चित्रीकरण करण्याआधी सगळ्यांची कोविड-19 ची चाचणी झालेली असणंही आवश्यक असल्याचे या नियमावलीत नमूद केले आहे. 
स्वच्छ जागा, उपकरणांचे सॅनिटायझेशन, मास्क आणि ग्लोव्जचा वापर, स्वच्छ अन्न या सगळ्या गोष्टींची दक्षता घेणं आवश्यक असल्याचेही नियम यात आहेत.  यात असं म्हटलं गेलं आहे की, “कोरोना व्हायरस करिता केलेल्या लॉकडाउन किंवा आंशिक लॉकडाउन नंतर सुरु केल्या जाणाऱ्या शूटिंग काल्पनिक आणि वास्तविक कार्यक्रमांसाठी अनिवार्य अशा नियम व अटींची रुपरेषा आखण्यात आलेली आहे ज्याचे शूटिंगच्या दरम्यान पालन करणे आवश्यक आहे.”

 यात सोशल डिस्टंसिंग आणि आरोग्य संबंधी सावधगिरीचे नियम, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांसाठी नियम, स्टुडिओच्या/लोकेशन ठिकाणी घेतली जाणारी काळजी, कलाकार व स्पर्धकांसाठीचे नियम (काल्पनिक व वास्तविक कार्यक्रमांसाठी), मेकअप-हेअरड्रेसिंग, कॉश्यूमसाठीचे नियम, ट्रान्सपोर्टसाठीचे नियम, कॉल टाईम आणि शुटिंगचे तास, टेक्निकल विभागासाठीचे नियम, स्टोरी लाईन व स्क्रिप्टविषयीचे नियम, काल्पनिक आणि वास्तविक कार्यक्रमांसाठीचे मनुष्यबळ विषयक नियम आणि एकूणच विविध विभागाने कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे हे या नियमावलीत आहे. 
या नियमांचे पालन केले तरच चित्रीकरण करता येणार असल्याचे यात म्हटले आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive