
ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. ड्रग्स प्रकरणात ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती आणि भाऊ शौविक चक्रवर्तीसह इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. मात्र आता या प्रकरणात मंगळवारी मुंबई कोर्टाकडून रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. मात्र आज न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला आहे. भाऊ शौविकचा जामीन अर्ज मात्र फेटाळला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीसह, सॅम्युल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना जामीन मंजूर केला आहे. तर रियाला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. पुढील 10 दिवस 11 ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. मात्र रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.