बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं. 14 जून रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या जाण्याचं दु:ख, त्या जखमा ताज्या असतानाच त्याची पहिली पुण्यतिथी आली यावर विश्वास बसणं कठीण आहे. त्यातच सुशांतच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे.
पवित्र रिश्ता ही मालिका सुशांतच्या अभिनय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरली. या मालिकेने त्याला मानव ही नवी ओळख दिली. या मालिकेतली नायिका अर्चना म्हणजेच अभिनेत्री अंकिता लोखंडे यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. दोघंही तब्बल सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. एकत्रही रहात होते. पण काही काळानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.
सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडेने सुशांतचे काही कधीही न पाहिलेले फोटो व व्हिडीओ चाहत्याशी नुकतेच शेअर केले आहेत.
अंकिताने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, तिच्या आणि सुशांतच्या नात्यामध्ये तणाव आला होता. त्यामुळेच त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा दोघांचा निर्णय होता. अंकिताने सांगितले, ‘ सुशांतने त्याच्या करीअरला निवडले आणि तो आयुष्यात पुढे निघून गेला. परंतु आमच्या ब्रेअकअप नंतर माझ्या आयुष्यातील पुढचे दीड वर्षे खूप वेदनादायी होते.’