By  
on  

बिग बींनी ट्विट करत सांगितलं, ‘मी नागराज मंजुळेच्या झुंडमध्ये काम करतोय’

महानायक अमिताभ बच्चन आणि ‘सैराट’ दिग्दर्शक नागराज मंजुळे एकत्र सिनेमा करणार अशी बरीच चर्चा रंगली होती. याबाबतच्या अनेक उलट-सुलट बातम्यासुध्दा येत होत्या. पण अखेर बिग बींनी ट्विट करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. आपण नागराजच्या सिनेमात काम करत असून लवकरच सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करु, असं ट्विट त्यांनी नुकतंच केलं आहे. तसंच एवढ्यावरच न थांबता त्यांनी नागराज मंजुळे आणि सुधाकर रेड्डी यंकट्टी यांच्या ‘नाळ’ सिनेमाचा ट्रेलरसुध्दा शेअर केला  आहे.

https://twitter.com/SrBachchan/status/1061347589302312961

येत्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून नागपुरात ‘झुंड’ सिनेमाचं शुटींग सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. ते नागपूरमध्ये सलग 45 दिवस या सिनेमाचं शूटींग करणार अहेत. तसंच संपूर्ण सिनेमाच 70-80 दिवसात पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

महत्त्वाचं म्हणजे काही महिन्यांपूर्वीच बिग बींनी नागराज मंजुळेचा हा सिनेमा सोडल्याच्या बातम्या येत होत्या. यासाठी बिग बींनी आपल्याकडे तारखा नसल्याचं कारण दिल्याचं बोललं जात होतं. पण अखेर त्या अफवाचं ठरल्या.

‘झुंड’ सिनेमात बिग बींसोबत काम करण्यास नागराज मंजुळेसुध्दा प्रचंड उत्सुक आहेत. ते स्वत: बिग बींचे खुप मोठे चाहते आहेत. एका क्रिडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत बिग बी आपल्यासमोर या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येतील. फुटबॉल या खेळाभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे.

सर्वांनाच आता बिग बी आणि नागराज मंजुळे हे समिकरण असलेल्या ‘झुंड’ सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive