By  
on  

68 वर्षांचा झाला ‘थलैवा’, रजनीकांतच्या वाढदिवासानिमित्त 'पेट्टा'चा टिझर रिलीज

तो आला..., त्याने पाहिलं..... आणि त्याने जिंकलं..... असंच काहीसं म्हणता येईल शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत यांच्याबद्दल. आज त्यांचा वाढदिवस आहे. रजनीकांतचा वाढदिवस चाहत्यांसाठी कोणत्याही सणाइतकाच महत्त्वाचा असतो.

अत्यंत कमी वयात आईचं छत्र हरवलेल्या शिवाजीला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं. घर चालवण्यासाठी त्याने कंड्क्टरची नोकरी केली खरी पण तिथेही त्याच्यातील कलाकार शांत बसला नाही. अभिनयाची हीच ओढ त्याला चेन्नईमधील फिल्म इन्स्टीट्युटमध्ये घेऊन गेली. तिथेच मराठमोळा शिवाजी गायकवाड थलैवा रजनीकांत झाला. रजनीला बालाचंदर यांनी पहिला ब्रेक दिला. त्यामुळेच कि काय रजनी त्यांना कायमच गुरुस्थानी मानतो.

रजनीकांतची सिनेसृष्टीतील सुरुवात ग्रे शेडच्या भूमिकांनी झाली असली तरी त्याने लवकरच स्वत:ला हिरो म्हणून प्रस्थापित केलं. छिलकाम्मा चेप्पिनेडी या चित्रपटाने त्याची हिरो म्हणून ओळख बनवली. त्यानंतर मात्र रजनीकांतचा ‘लेजंड रजनीकांत’पर्यंतचा प्रवास अगदी वेगाने झाला. बॉलिवूडमध्येही रजनीच्या चित्रपटांनी लोकप्रियता मिळवली. रजनीला २००० मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. २०१६ मध्ये रजनीला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.

रजनीचे चित्रपट जितके सुपरहिट असतात तितकेच त्याच्या नावाने सोशल मिडियावर व्हायरल होणारे जोकही असतात. वैशिष्ट्यपूर्ण अभिनय आणि संवादफेकीची उत्तम शैली यामुळे रजनीकांतला डोक्यावर घेतात. रजनीने आतापर्यंत भारतीय तसेच परदेशी सिनेमांमध्येही काम केलं आहे. जॅकी चेन नंतर सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता म्हणून रजनीचं नाव घेतलं जातं. वय वाढत असलं तरी श्रीदेवीपासून ते अ‍ॅमी जॅक्सनपर्यंतच्या अभिनेत्रींचा हिरो व्हायचं भाग्य रजनीला लाभलं.

रजनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आगामी ‘पेट्टा’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझर पाहून खात्री पटते की हा ६८ वर्षांचा ‘तरुण’ ‘किंग ऑफ स्वॅग’ का आहे ते.

Recommended

PeepingMoon Exclusive