सैराट फेम मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा पहिला वहिला बॉलिवूड सिनेमा आणि या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन हे समिकरण म्हणजे चाहत्यांत्यासाठी दुग्धशर्करा योगच जुळून येतोय.
‘झुंड’ या बहुचर्चित सिनेमानिमित्ताने दोन दिग्गज कलावंत एकत्र येत असल्याने मराठी सिनेसृष्टीसह तमाम बॉलिवूड कलाकारांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येतेय. आता या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ‘झुंड’ हा सिनेमा येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.
‘झुंड’ हा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. याच विजय बारसे यांच्या आयुष्यावर या सिनेमाचं कथानक बेतलं आहे. विजय बारसे क्रिडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत बिग बी आपल्यासमोर या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येतील.
महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर या सिनेमानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांचे गॉडफादर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’मध्ये हे दोघं सामिल होणार असल्याचे वृत्त आहे.
https://twitter.com/taran_adarsh/status/1097731459043909632
महत्त्वाचं म्हणजे काही महिन्यांपूर्वीच बिग बींनी नागराज मंजुळेचा हा सिनेमा सोडल्याच्या बातम्या येत होत्या. यासाठी बिग बींनी आपल्याकडे तारखा नसल्याचं कारण दिल्याचं बोललं जात होतं. पण अखेर त्या अफवाचं ठरल्या.