अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीमधील एक महान अभिनेते आहेत. ते जरी आता ७६ वर्षांचे असले तरी त्यांची याही वयातली एनर्जी सर्वांना थक्क करते. अमिताभ बच्चन यांनी अयान मुखर्जीचा 'ब्रम्हास्त्र', नागराज मंजुळेचा 'झुंड', एस. जे. सूर्या यांचा 'तेरा यार हूँ में', अशा सिनेमांचं शूटिंग नुकतंच संपवलं आहे. तसेच रुमी जेफ्री यांच्या आगामी ,चेहरे, या सिनेमात ते काम करणार आहेत.
पिपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांना शुजीत सरकारने आगामी सिनेमासाठी करारबद्ध केले आहे. या सिनेमाची शूजीत निर्मिती करणार की दिग्दर्शन करणार की दोन्ही हे अजून निश्चित नाही. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असून या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आयुष्यमान खुराणा झळकण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आयुष्यमानशी बोलणं सुरु असून त्याने जर होकार दिला, तर या सिनेमात हे दोन वेगळे कलाकार एकमेकांसोबत काम करताना दिसतील.
या आगामी सिनेमाबद्दल सविस्तर माहिती अद्याप हाती आलेली नसली तरी पिपिंगमूनच्या वृत्तानुसार जुही चतुर्वेदी या सिनेमाचं पटकथा लिहीत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन, शुजीत सरकार आणि जुही चतुर्वेदी 'पिकू' सिनेमानंतर चार वर्षांनी पुन्हा एकत्र काम करणार आहेत. तसेच 'विकी डोनर' नंतर आयुष्यमान खुराणा २०१२ नंतर शुजीत सरकारसोबत काम करणार आहे.
शुजीत सरकार सध्या स्वातंत्र्यवीर सरदार 'उधम सिंग' यांच्या बायोपिकचं शूटिंग सध्या परदेशात करत आहेत. या सिनेमात विकी कौशल प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. आयुष्यमान खुराणा सध्या अमर कौशिक यांच्या बाला या सिनेमात काम करत असून २०१९च्या सप्टेंबर महिन्यात आयुष्यमानचा शुभमंगल ज्यादा सावधान हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.