Exclusive: कॅन्सरवर यशस्वीरीत्या मात करून ऋषी कपूर दिवाळीत भारतात परतणार
ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. पिपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार येत्या दिवाळीत ऑक्टोबर महिन्यात ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचार घेऊन भारतात परतणार आहेत.
ऋषी कपूर यांचे मोठे भाऊ आणि अभिनेते रणधीर कपूर यांनी काही महिन्यांपूर्वी ऋषी कपूर कॅन्सरमुक्त झाल्याची बातमी सर्वांना सांगितली. गेल्याच आठवड्यात रणबीर कपूर हा ऋषी कपूर यांना भेटून आल्यावर आपले बाबांचे आरोग्य सुधारले असल्याची माहिती सांगताना म्हणाला,'त्यांची एनर्जी अफाट आहे. तुम्हा सर्वांकडून त्यांना खूप सकारात्मकता मिळाली आहे.' अशी पोस्ट त्याने ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी आणि इंडस्ट्री मधल्या मित्रांसाठी पोस्ट केली.
ऋषी कपूर जेव्हा कॅन्सरचे उपचार घेत होते तेव्हा बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सच्या एका टाॅक शो साठी शाहरुख खान गेला असता तो ऋषी कपूर यांना भेटून आला. त्याआधी बमन इराणी यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली. तेव्हा कॅन्सर झालेला असूनही ऋषी कपूर यांची अफाट एनर्जी त्यांना थक्क करून गेली. बामन यांनी 'स्टुडन्ट ऑफ द इयर' आणि 'हाऊसफुल २' सारख्या सिनेमांत ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले आहे.
काही दिवसांपूर्वी जेव्हा अभिनेता विकी कौशल ऋषी कपूर यांना भेटायला गेलेला तेव्हा नीतू कपूर यांनी फोटो पोस्ट करून त्याखाली लिहिलं होतं,'आमच्या विनयशील आणि प्रेमळ कमलीला (विकीची 'संजू' सिनेमातील भूमिका) भेटा.'
तसेच आमिर खान, प्रियांका चोप्रा जॉन्स, दीपिका पादुकोण, अनुपम खेर यांसारखे कलाकार सुद्धा ऋषी कपूर यांना भेटायला गेले होते. ऋषी कपूर सध्या ६६ वर्षांचे आहेत. ''सिनेमांमध्ये अभिनय करणं हे माझ्या बाबांचं स्वप्न होतं. करीयरच्या सर्वोच्च शिखरावर असताना कॅन्सरमुळे त्यांना थोडा धक्का बसला आहे.'' अशी आपल्या बाबांविषयी भावना रणबीर कपूरने व्यक्त केली. संपूर्ण कपूर कुटूंब ऋषी कपूर यांचं भव्य स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे.