'कबीर सिंग'च्या यशस्वी एक महिन्यानंतर अभिनेत्री कियारा अडवाणीने लिहिली एक इमोशनल पोस्ट
तो आला! तो झळकला! आणि त्याने जिंकलं! ही गोष्ट कोणत्याही व्यक्तीची नसून एका सिनेमाची आहे. सिनेमा आहे 'कबीर सिंग'. समीक्षकांकडून आणि स्त्रीवादी संघटनांकडून टीकेचा भडीमार झाला असला तरी 'कबीर सिंग'वर प्रेक्षकांनी मात्र भरभरून प्रेम केले. हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. अजूनही हा सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे.
सिनेमाला एक महिना पूर्ण झाल्याच्या प्रसंगी या सिनेमातील अभिनेत्री कियारा अडवाणीने स्वतःच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. कियारा लिहीते,'मी आनंदाच्या परमोच्च शिखरावर आहे. कुठून लिहिण्याची सुरुवात करू काही कळत नाही. मी माझ्या सिनेमाच्या संपूर्ण टीमची आणि विशेषतः प्रेक्षकांची ऋणी आहे ज्यांनी कबीर सिंगला यशस्वी केले. जेव्हा या सिनेमातील व्यक्तिरेखेविषयी मी वाचले तेव्हा ती माझ्या अगदी विरुद्ध होती. परंतु या व्यक्तिरेखेचा आत्मा मी समजून घेतला. तिच्या प्रेमाच्या ताकदीचा अनुभव घेतला. आणि मनापासून ही प्रेमकहाणी तुमच्यासारखीच मी सुद्धा जगले.'
शाहिद कपूरबद्दल कियारा लिहिते,'या सिनेमाच्या निमित्ताने मला एक सच्चा दोस्त मिळाला आहे. त्यांच्या साथीने या सिनेमाचा प्रवास विश्वसनीय झाला. मी तुमच्या वेडेपणाला खूप मिस करत आहे. तुमच्यासोबत काम करणं माझ्यासाठी खूप भाग्यशाली गोष्ट होती.'
या पोस्टमध्ये कियाराने सिनेमाचे दिग्दर्शक संदीप रेड्डीचे सुद्धा आभार मानले आहेत. तसेच सर्वांगसुंदर गाण्यांबद्दल सिनेमाचे गीतकार, संगीतकार आणि निर्मात्यांचे तिने आभार मानले. हा सिनेमा २१ जूनला प्रदर्शित झाला होता. या सिनेमानंतर कियारा बॉलीवूडमधील एक बहुचर्चित अभिनेत्री झाली आहे.