अक्षय कुमारच्या आगामी 'मिशन मंगल'ची जोरदार चर्चा आहे. भारताने जी मंगळावर अवकाशमोहीम केली होती, त्यावर आधारित हा सिनेमा आहे. 'मिशन मंगल' विषयी अक्षयने एक गोष्ट त्याच्या चाहत्यांशी शेयर केली. या सिनेमातील महिला सक्षमीकरणाविषयी अक्षयने एक खुलासा केला.
''पुरुषांच्या तुलनेत महिला बरोबर नाहीत तर पुरुषांपेक्षा कितीतरी पुढे आणि जास्त पॉवरफुल आहेत. जेव्हा मंगळयानाने अवकाशात झेप घेतली होती, तेव्हा त्या यानाला MOM(मार्स ऑर्बिटर मिशन) असं म्हटलं गेलं, असं ट्विंकलने लिहिलं होतं. या यानाला DAD असं म्हणालो असतो तर हे यान अजूनही जमिनीवरच असतं. ट्विंकलने लिहिलेल्या या वाक्यांचा मी सिनेमात वापर केला आहे. आणि माझी अशी इच्छा आहे कि सर्व पालकांनी आपल्या मुलांसोबत हा सिनेमा पाहावा'', असं मत अक्षयने व्यक्त केलं.
अक्षय पुढे म्हणाला,''भारतीय पुस्तकांमध्ये महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी लेखलं गेलं आहे, याची खंत आहे. आता या संकुचित विचारसरणीला संपवायची वेळ आली आहे.'' अवकाशमोहिमेवर आधारित सिनेमा बनवणं हे सर्वांसाठी एक आव्हान असतं, परंतु हा सिनेमा आम्ही ३२ दिवसात शूट केला, याचा मला आनंद आहे.
'मिशन मंगल' ISRO मध्ये काम करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांची कहाणी आहे, ज्यांनी २०१४ च्या मंगळ मोहिमेसाठी विशेष योगदान दिले होते. या सिनेमात अक्षय कुमारसह विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कृति कुल्हारी, निथ्या मेनन आणि शर्मन जोशी सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत.जगन शक्ती दिग्दर्शित 'मिशन मंगल' १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.