By  
on  

Movie Review: 'बाला' म्हणतो, स्वतःवर प्रेम करायला शिका

कोणत्या ना कोणत्या शारीरीक समस्यांनी जगातला प्रत्येक माणुस ग्रासलेला असतो. या शारीरीक न्यूनगंडामधला एक म्हणजे अकाली येणारी केसगळती. या केसगळतीवर उपचार करता करता त्या विशिष्ट माणसाच्या नाकीनऊ येतात. याच समस्येवर विनोदी अंगाने भाष्य केलेला आयुष्मान खुरानाचा 'बाला' आपलं निखळ मनोरंजन करण्यात यशस्वी होतो. 

कथानक:
'बाला'ची सुरुवात होते बाल मुकुंद शुक्लाच्या(आयुष्मान खुराना) बालपणापासुन. लहानपणापासुन डोक्यावरचे केस उडवणं त्याला प्रिय. त्याच्या या सवयीमुळे शाळेमधली प्रत्येक मुलगी केस उडवणा-या 'बाला' वर प्रभावित होत असते. बालाबरोबर लतिका(भुमी पेडणेकर) ही सावळ्या रंगाची मुलगी सुद्धा असते. तिला तिच्या रंगावरुन सतत चिडवलं जात असल्याने ती त्रासुन गेली असते. पुढे 25 व्या वर्षी बालाच्या केसगळतीला सुरुवात होते. केसगळती रोखण्यासाठी बाला तब्बल 132 अयशस्वी उपाय करतो. त्यानंतर बालाच्या आयुष्यात परी(यामी गौतम)ची एन्ट्री होते. परी ही पेशाने माॅडेल असुन तिच्यासाठी 'दिसणं' हेच तिचं सर्वस्व आहे. पुढे बाला परीशी लग्न कसा करतो? आणि त्याच्या आयुष्यात कोणते ट्विस्ट अँड टर्न येतात हे तुम्हाला 'बाला' बघुन कळुन येईल. 

दिग्दर्शन:
अमर कौशिक यांनी 'बाला'च्या कथेला सुंदररित्या प्रेक्षकांसमोर आणले आहे. नीरेंद्र भट्ट यांचे उत्तम संवाद सिनेमातील प्रसंगांना एक वेगळीच जान आणतात. उत्तरार्धात सिनेमा थोडा संथ होतो. तरीही 'बाला'चा शेवट फिल्मी न करता वास्तववादी केल्यामुळे 'बाला' आणखी आवडतो. 'बाला'मध्ये टिक टाॅक अॅपचा सुद्धा चांगला वापर करण्यात आला आहे. 

अभिनय:
आयुष्मान खुरानाने 'बाला' मध्ये पुन्हा एकदा स्वतःमधल्या कलाकाराची ओळख प्रेक्षकांना करुन दिली आहे. प्रत्येक सिनेमागणिक आयुष्मान स्वतःच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. 'बाला'ही त्याला अपवाद नाही. लतिकाच्या भुमिकेत भुमी पेडणेकर आणि परीच्या व्यक्तिरेखेत यामी गौतम यांनी आपल्या भुमिका चांगल्या साकारल्या आहेत. सीमा पाहवा, सौरभ शुक्ला, जावेद जाफरी, अभिषेक बॅनर्जी आदी कलाकारांनी सुद्धा आपल्या भुमिका चोख वठवल्या आहेत. 

सिनेमा का पाहावा?
आयुष्मान सध्या प्रत्येक सिनेमागणिक स्वतःच्या अभिनयाचा स्तर उंचावत आहे. त्यामुळे तुम्ही जर आयुष्मानचे चाहते असाल तर 'बाला' तुम्हाला आवडुन जाईल. तसेच साध्या विषयावरील हलकाफुलका विनोदी सिनेमा पाहण्यासाठी 'बाला' आवर्जुन पाहावा

Recommended

PeepingMoon Exclusive