कलाकार: अदा शर्मा, राजेश शर्मा, अश्विनी काळसेकर
दिग्दर्शक : सीमा देसाई
निर्माते : पराग देसाई आणि सेजल कौशिक
रेटिंग: 4 मून्स
सध्या लॉकडाउनमध्ये सोशल मिडीया आणि विविध ऐपचा वापर जास्त वाढलाय. शिवाय सगळेच घरात बसून कुटुंबासोबतही वेळ घालवतोय. यातच नातेसंबंध जपण्यावर एक हटके लघुपट प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक सीमा देसाई यांची शॉर्ट फिल्म ‘टिंडे’ हा लघुपट सध्या चर्चेत आहे. पति- पत्नीच्या नात्यातली नोकझोक आणि या नात्यातला गोडवा या लघुपटात पाहायला मिळतोय. हा लघुपट हसवेल, मनोरंजन करेल आणि शेवटी भावुकही करेल.
कोणताही लघुपटात प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी त्याची कथा ही महत्त्वाची असते. ‘टिंडे’ या लघुपटातील कथाही साधी सोपी जरी असली तरी त्यांची मांडणी उत्तम आहे. त्यातच उत्तम कलाकारांची फळी असली की मग त्यांच्या अभिनयाने ती कथा आणखी फुलते. असचं झालय ‘टिंडे’ या लघुपटाच्या बाबतीत. क्रांति नावाचा चाळीशीतला एक सामान्य माणूस जो त्याच्या पत्नीच्या रोजच्या कटकटीपासून कंटाळलाय. त्याची पत्नी मात्र त्यांची चांगलीच काळजी घेते. सतत कटकट करणारी मात्र त्यातची पतिवर प्रेम करणारी ही पत्नी दाखवली आहे. क्रांतिचा कार्यालयातील एक मित्र त्याला एका डेटिंग ऐपची माहिती देतो. या ऐपच्या माध्यमातून कसं मुलींना भेटता येतं याविषयी सांगतो. या ऐपचं नाव ‘टिंडे’ असं दाखवलय. टिंडर वैगेर डेटिंग ऐप हे तरुणांमध्ये चर्चेत आहेत. तसाच काहीसा हा ऐप दाखवण्यात आलाय. या ऐपवर मुलींचे प्रोफाईल बघत असताना क्रांतिला मॉली शर्मा नावाची मुलगी सापडते. आणि इथूनच ही कथा रंजक होत जाते. मॉलीला भेटल्यानंतर क्रांती काय काय करु लागतो आणि ही कथा कशी पुढे जाते हे या लघुपटात मनोरंजक पद्धतिने दाखवलय.
अभिनेता राजेश शर्मा, अदाह शर्मा आणि अश्विनी काळसेकर या लघुपटात मुख्य भूमिकेत आहेत. तिघांच्या अभिनयाने ही कथा जबरदस्त खुलली आहे. अदाह शर्माचा सुंदर लुक सिनेमांप्रमाणे या लघुपटातही पाहायला मिळतोय. चतुर हुशार मॉली तिने उत्तम साकारली आहे. शिवाय राजेश शर्मा यांनी साकारलेला भोळा क्रांति चांगलाच भाव खाऊन गेला आहे. राजेश शर्मा यांनी विविध जॉनरचे सिनेमे केलेले आहेत आणि या कथेतील क्रांतिच्या भूमिकेतही ते उत्तम शिरलेत. अदा शर्मा फ्रेममध्ये दिसताच तिचा सुंदर चेहरा आकर्षणाचा भाग ठरतो.
तांत्रिक दृष्ट्या हा लघुपट मजबूत ठरला आहे. यासाठी सीमा देसाई यांनी त्यांच्या टीमकडून चांगलं काम करून घेतल्याचं पाहायला मिळतय. लघुपटाचं छायांकनही उत्तम झालं आहे. 20 मिनीटांच्या या लघुपटावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. तेव्हा या लॉकडाउनच्या काळात मनोरंजन करणारा आणि नातेसंबंध जपणारा ‘टिंडे’ पाहायला काहीच हरकत नाही. 20 मिनीटांचा हा लघुपट तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल यात शंका नाही.