कोरोना व्हायरसचा सुळसुळाट थांबण्याचं नाव घेत नाही आणि याच्या विळख्यात काही बॉलिवुड कलाकारही आले आहेत. नुकतच बॉलिवुडमधील प्रसिद्ध कलाकार किरण कुमार यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यांच्या परिवारासाठी आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. किरण यांच्या कोरोनाच्या तिसऱ्या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आली आहेत.
किरण कुमार यांच्यातर्फे त्यांचं स्टेटमेंट नुकतच समोर आलं आहे. या ते सांगतात की, “काही आठवड्यांपूर्वी मी रुटीन चेकअपसाठी गेलो होतो. ज्यावेळी कोरोनाची चाचणी करणं अनिवार्य होतं. माझी मुलगी माझ्यासोबत टेस्ट करण्यासाठी माझ्या सोबत आली होती. आणि त्यावेळी आम्ही गंमत करत होतो की हे फक्त आपण औपचारिकता म्हणून करतोय. मात्र माझी कोरोनाच्या चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.”
याविषयी सांगताना डॉक्टरांची कशी मदत झाली याविषयी ही ते सांगतात. ते म्हणतात की, “आम्ही जवळपास एका तासात घरातला एक फ्लोर बंद करून त्याचं आयसोलेशनमध्ये रुपातंर केलं. हिंदुजा खार आणि लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आम्हाला योग्य ती माहिती देऊन मार्गदर्शन केलं की आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही बीएमसीलाही माझ्याविषयी माहिती दिली आणि सगळ्यांना विटामिन देण्यात आलं.”
मात्र तिसऱ्या चाचणीचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला असल्याने किरण यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते सांगतात की, “आज कोविड-19 साठी पुन्हा टेस्ट केल्यानंतर मला हे सांगताना आनंद होत आहे की, माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. माझा परिवार होम आयसोलेशनचे नियम पाळतोय.”
सध्या किरण कुमार या वेळेत मेडिटेशनही करत आहेत. ऑनलाईन कंटेंट आणि पुस्तकही वाचत आहे. या सगळ्यात किरण यांनी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.