मोहक सौंदर्य, नृत्य कौशल्य आणि दमदार अभिनय यांच्या जोरावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मनोरंजन विश्वातील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रत्येक कामात वैविध्य असणाऱ्या, त्यात नाविन्य आणण्याचा सोनालीचा प्रयत्न असतो. सोनालीचं नृत्यातील अभिनयकौशल्यही कायम लक्षवेधी ठरलय. शिवाय तिने आत्तापर्यंत काम केलेल्या चित्रपटांमधील तिची गाणी, त्याचं संगीत, गीत, गायन या बाबतीतही ही गाणी दर्जेदार ठरली. तिची अनेक गाणी गाजली पण सोनालीच्या वाढदिवसानिमित्ताने तिच्या गाजलेल्या या 5 गाण्यांचा हा आढावा..
अप्सरा आली...
अप्सरा आली... या गाण्याने सोनाली कुलकर्णीला मराठी सिनेसृष्टीत खरी ओळख मिळाली. या गाण्यात ती झळकली आणि जणू स्वर्गातील अप्सराच धर्तीवर अवतरली असल्याचं जाणवलं. सौंदर्य आणि नृत्य कौशल्याने तिने या गाण्यातून लोकप्रियता मिळवली. नृत्यदिग्दर्शिका फुलाव खामकरने हे गाणं उत्तम दिग्दर्शित केलं होतं. रवी जाधव दिग्दर्शित नटरंग या गाजलेल्या चित्रपटातील हे गाणं अत्यंत लोकप्रिय ठरलं. गुरु ठाकूरचे गीत, अजय-अतुल यांचं संगीत, गायिका बेला शेंडे आणि अजय-अतुल यांचा आवाज लाभलेल्या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे.
भिजून गेला वारा...
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या इरादा पक्का या चित्रपटात सोनाली ही अभिनेता सिद्धार्थ जाधवसोबत झळकली होती. या चित्रपटातील भिजून गेला वारा हे अंगावर शहारा आणणारं गाणं लोकप्रिय ठरलं होतं. सोनालीच्या अदा आणि सिध्दार्थसोबतची तिची हटके केमिस्ट्र या गाण्यातून पाहायला मिळाली होती. क्षितीज तारे, नीहिरा जोशी यांनी हे गाणं गायलं असून अश्विनी शेंडे यांच्या सुंदर शब्दात हे गाणं निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. निसर्गरम्य वातावरण, रोमान्सने भरलेल्या सोनाली-सिध्दार्थच्या या गाण्याने तरुणाईला वेड लावलं होतं.
सावर रे...
अभिनेता स्वप्निल जोशीसोबतची सोनाली कुलकर्णीची जोडी मोठ्या प्रमाणात पसंत केली गेली ती मितवा या चित्रपटात. त्यांचा रोमान्स, संवाद, गाणी चांगलीच भाव खाऊन गेली. या चित्रपटातील अनेक गाणी लोकप्रिय ठरली, त्यापैकी एक म्हणजे ‘सावर रे..’ या गाण्यातील सोनाली आणि स्वप्निलचा रोमान्स, जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्निल बांदोडकर या गायकांचा गोड आवाज, निलेश मोहरीरचं संगीत आणि अश्विनी शेंडे यांचं गीत असं कमाल कॉम्बिनेशन या गाण्यात पाहायला, ऐकायला मिळालं.
मदन पिचकारी...
रवी जाधव दिग्दर्शित 'टाईमपास – 2' या चित्रपटात एका धमाल आयटम साँगने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. मदन पिचकारी या गाण्यात सोनाली कुलकर्णीने तिच्या अदा, हावभाव, नृत्य कौशल्याच्या जोरावर या गाण्याची शोभा आणखी वाढवली. चिनार महेशचं संगीत, मंगेश कांगणे यांचे गीत आणि अपेक्षा दांडेकर, इश्क बेक्टरचा आवाज या गाण्याला लाभला आहे.
सिम्पल सिम्पल...
'पोश्टर गर्ल' या सोनाली कुलकर्णीच्या चित्रपटात एका गाण्यात ती विविध रुपात दिसली. सिम्पल सिम्पल हे गाणं तितकं लोकप्रिय ठरलं नसलं तरी या गाण्यातील व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला तो सोनालीच्या विविध रुपांसाठी. एकाच गाण्यात सोनाली कधी वेस्टर्न, कधी साडी, लाँग गाऊन ड्रेस अशा वैविध्यपूर्ण रुपांनी नटलेली दिसली. या गाण्याला गायक हर्षवर्धन वावरेचा आवाज असून, अमीतराज यांचं संगीत आणि क्षितिज पटवर्धन यांचे गीत आहेत.