By  
on  

मराठीतल्या या लोकप्रिय अनुभवी अभिनेत्रींनी गाजवलय हिंदी मालिकाविश्व

मराठी नाटक, चित्रपट, मालिका विश्वातील दांडगा अनुभव आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक अभिनेत्रींनी लोकप्रियता मिळवली. पण फक्त मराठीच नाही तर या अनुभवी अभिनेत्री हिंदी मालिकांमध्येही दिसू लागल्या. हिंदी मालिका प्रेक्षकांकडूनही या अभिनेत्रींना पसंतीची पावती मिळाली आहे. या मराठी अभिनेत्रींचा हिंदी मालिका विश्वात दबदबा पाहायला मिळालाय. त्यापैकी काही लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्रींचा हा आढावा.. 

उषा नाडकर्णी 
मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये दृष्ट सासू आणि विविध भूमिकांसाठी उषा नाडकर्णी प्रसिद्ध आहेत. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत त्यांनी खाष्ट सासू साकारली. इतक्या कुशलतेने की ते पात्र खरं वाटू लागलं आणि प्रेक्षक या सासूच्या पात्राचा द्वेष करू लागले. हीच त्यांच्या अभिनयाची पोचपावती. हिंदी मालिका विश्वात उषा नाडकर्णी यांची लोकप्रियता आता चांगलीच वाढलीय. 

नीना कुळकर्णी 
अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांमधून उत्तमोत्तम कामं केली आहेत. अभिनयाचा दांडगा अनुभव असलेल्या नीना कुळकर्णीही हिंदी मालिकेत झळकल्या. कधीही न पाहिलेलं असं त्याचं रुप आणि पात्र 'ये है मोहब्बतें' या मालिकेत पाहायला मिळालं. या मालिकेत त्यांनी आईची भूमिका साकारली होती. याशिवाय एक पॅकेट उमीद, मेरी माँ या हिंदी मालिकांमध्येही त्या झळकल्या.

मृणाल कुलकर्णी
हिंदी मालिकांमध्ये मृणाल कुलकर्णी हे नाव नवं नाही. सोनपरी म्हणून त्यांची ओळख ही आजही कायम आहे. मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील हा लोकप्रिय चेहरा हिंदीतही लोकप्रिय ठरला. सोनपरीनंतरही त्यांनी अनेक हिंदी मालिका केल्या. 

किशोरी शहाणे
मराठी चित्रपटसृष्टीत 80, 90 च्या दशकातील लोकप्रिय मोहक सौंदर्य असलेली अभिनेत्री किशोरी शहाणे यांची पावलही हिंदी मालिकाविश्वाकडे वळली. त्या अनेक हिंदी मालिकांमध्ये विविध भूमिकांमध्ये दिसल्या. गुम है किसी के प्यार मे या लोकप्रिय हिंदी मालिकेत त्या सध्या भवानी हे पात्र साकारत आहेत.

रेशम टीपणीस
अभिनेत्री रेशम टीपणीस यांनी तर हिंदी मालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलय. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतला अनुभव, अभिनय कौशल्य, नृत्यकौशल्याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. हिंदीत त्यांनी जवळपास 20 मालिका केल्या आहेत.

रिमा लागू
रिमा लागू हे हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वातील मोठं नाव. त्यांची कारकिर्द फार मोठी आहे. यात हिंदी मालिकांचाही समावेश आहे. खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मै मै या त्यांनी केलेल्या मालिका लोकप्रिय ठरल्या. नामकरण ही त्यांची शेवटची हिंदी मालिका ठरली.  2017 मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

सुप्रिया पिळगांवकर
तू तू मै मै मालिकेतून सुप्रिया पिळगावकर यांना हिंदी टेलिव्हीजन पाहणाऱ्या प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली. मराठी चित्रपटांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या सुप्रिया पिळगावकर हिंदी मालिका विश्वातही प्रसिद्ध झाल्या. कुछ रंग प्यार के ऐसे भी या प्रसिद्ध हिंदी मालिकेतील त्यांची आईची भूमिका लक्षवेधी ठरली. आता याच मालिकेच्या नव्या पर्वातही त्या आईच्या भूमिकेत आहेत.

निशिगंधा वाड
मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात निशिगंधा वाड हे नाव प्रसिद्ध आहे. निशिगंधा यांनी हिंदी मालिका विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. हिंदी मालिकांमधील त्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

स्मिता जयकर
अभिनेत्री स्मिता जयकर यांनी अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. मराठीपेक्षा स्मिता जयकर या हिंदीत जास्त लोकप्रिय ठरल्या. त्यांनी साकारलेली आई ही प्रत्येक वेळी वेगळी होती. आईच्या भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं.  1993 पासून त्या हिंदी मालिकाविश्वात काम करतायत.  

वर्षा उसगांवकर
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी 1988 -1990 काळातील 'महाभारत' या लोकप्रिय ऐतिहासिक मालिकेतून हिंदी मालिकाविश्वात काम केलं. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत सक्रिय असलेल्या वर्षा उसगांवकर यांनी अनेक हिंदी मालिका केल्या. मात्र काही वर्षांनी  सुख म्हणजे नक्की काय असतं या मराठी मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन केलं.

अनेक तरुण मराठी अभिनेत्रीही आता हिंदी मालिका आणि कार्यक्रमातून लोकप्रिय ठरत आहेत. मात्र असं असलं तरी त्यांनी मराठीची वाट सोडलेली नसल्याचं चित्र अनेकदा पाहायला मिळालय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive