By  
on  

Tea Day Special : "अहाहा चहा" म्हणत कलाकारांनी शेयर केलं चहासोबतचं खास नातं, कलाकारांच्या आयुष्यात चहाचं अनन्यसाधारण महत्त्व

चहा अनेकांसाठी आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनलाय. पण मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी चहा हा वेगळीच ऊर्जा घेऊन येतं. कलाकार आणि चहाचं नातं वेगळं आहे. त्यांच्यासाठी चहा हा दररोजचा सोबती बनलाय. अशाच काही चहाप्रेमींनी त्यांच्या आयुष्यातील चहाचं महत्त्व आणि चहासोबतच्या खास "अहाहा चहा" आठवणी शेयर केल्या आहेत.

सिद्धार्थ जाधव, अभिनेता 
"कलाकार आणि चहाचं नातं तर वेगळच आहे. आम्ही जी सगळी एकांकिक स्पर्धेतील मुलं आहोत म्हणजे तालमीच्या वेळी आम्ही दिवसभर चहावरच असतो. रुपारेलच्या समोर एक चहावाले होते दुबेजी, त्याचं निधन झालय. पण ते आम्हाला खूप मदत करायचे. पैसे नसताना चहा द्यायचे. आमच्या रुपारेलच्या कॅंटीनमध्ये साम्बा आणि शीवा अशी दोन लोकं होती जी आम्हाला चहा द्यायचे. शिवाजी मंदीरला काम करताना बाळू मामा जे आपल्या सगळ्यांचे लाडके आहेत, ते जेव्हा इंटरव्हलला चहा घेऊन येतात ती एक आठवण आहे. चहा आणि माझं प्रेम खूप मस्तय. मला खासकरून चहामध्ये आलं किंवा गवती चहा वैगेर असं काही आवडत नाही. तर साखर, चहा पावडर आणि दूधअसा साधा चहा आवडतो. माझा बॉय जो आहे राजू त्यालाही माहितीय मला कसा चहा लागतो ते. चहामध्ये सध्या खूप प्रकार आहेत. चहाचं महत्त्व कलाकाराच्या आयुष्यात खूप आहे. तसच माझ्याही आयुष्यात खूप आहे. मी देशात किंवा परदेशात कुठेही गेलो तेव्हा पोहे खात असेल तर मला चहा लागतोच. पोहे आणि चहा हे कॉम्बिनेश माझं ठरलेलं असतं."

सोनाली खरे, अभिनेत्री
"मला चहा आवडतो पण नाशिक, शेगाव सारख्या ठिकाणी जे दूध मिळतं त्याचा जो चहा बनतो ना तो प्रचंड आवडतो. माझ्या चहासोबतच्या खास आठवणी म्हणजे मी दिवाळीतली चकली त्या चहामध्ये बुडवून खायची मग तो चहा प्यायचा. ती जी चव असते ना अहाहा असते. पण सुरुवातीपासूनच रोज चहा प्यायची मला सवय नाही. मला चहासाठी काहीतरी छान प्रसंग लागतो तेव्हा मी तो चहा पिते त्याचा आस्वाद घेते किंवा त्याचा आनंद लुटते. किंवा पावसाळ्यात छान नास्ता असेल तर त्यासोबत चहा घेते. पण चकली आणि चहा हे कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडतं."

 

आदिती सारंगधर, अभिनेत्री

"चहा माझ्यासाठी दररोजचा औषधाचा डोस, दररोजचा विटामीन सीचा डोस, मल्टीविटामीन डोस आहे.. मला चहाची कधीच सवय नव्हती. पण मी जेव्हा सुहासला डेट करायला लागले आणि आम्ही एकत्र रहायला लागलो तेव्हा मग त्याला सकाळी उठून चहा प्यायची सवय होती. मग त्याच्यासाठी मी चहा करायला सुरुवात केली. त्याला चहा पिण्यासाठी कंपनी देण्याच्या नादात मला चहा पिण्याची जी सवय लागली ती आत्तापर्यंत आहे. माझा चहा नाटकासारखा होतो. रोज एक वेगळा प्रयोग असतो. त्यामुळे माझा चहा प्यायला लोकं आलीत वैगेर असं काही होत नाही. पण मस्त आलं घातलेला चहा, तो उकळायला लागला की मग लेमन ग्रास घालायचं आणि त्याचा जो स्वाद येतो तो अहाहा असतो."

 

शीव ठाकरे, अभिनेता
"मी लहानपणापासून  चहा पितोय. लहानपणी मी चार ते पाच वाजता उठायचो. चहा आणि त्याच्यासोबत पोळी खायचो. आत्ताही कधी भूक लागली आणि आईने आवडती भाजी बनवली नसेल किंवा स्वयंपाक करायला खूप वेळ लागणार असेल तर उत्तम पर्याय म्हणजे पटकन चहा बनवायचा आणि चहा-पोळी खायचं. मस्त पोट भरतं. चहा माझी भूक भागवतं असं म्हणता येईल."

अभिषेक देशमुख, अभिनेता
"चहा हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. मला ग्रीन टी, कश्मिरी टी पासून टपरीवरच्या चहा पर्यंत सगळं आवडतं. दिवसातून एकदा तरी घरचा चहा लागतोच. कृतिका आणि माझी आई वेगवेगळा चहा करतात पण दोघींच्या हाताची चव मला आवडते. मी सुध्दा वेलची, लवंग, आलं, तुळस, गवती चहा वापरून चहा करतो. चहा पिताना उत्तम व्यक्तीची कंपनी असेल तर जी तरतरी येते त्याची मजा निराळी असते."

किशोरी शहाणे, अभिनेत्री
"माझे पति दिपकजींना जेव्हा चहा प्यायचा असतो तेव्हा मलाही चहा प्यायचा असतो.. चहा म्हणजे आमच्यासाठी रोमान्स म्हणता येईल. जेव्हा मी शूटींगला नसेल तर संध्याकाळी आम्हाला दोघांना एकत्र चहा प्यायला आवडतो. दिपकजी हे माझं चहा प्यायचं महत्त्वाचं कारण आहे. मी इतका चहा पीत नसले तरी दिपकजींसोबत असले तर आम्ही एकत्र चहा घेतोच."

संजय शेजवळ, अभिनेता
"मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या चहाची चव घ्यायला आवडतं. सकाळी चहा घेतला की फ्रेश वाटतच पण शूटींग करत असेल तेव्हा तर 3 ते 4 कप चहा लागतोच. त्यात मग मी ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी, साखर नसलेला चहा, जॅगरी चहा असे वेगवेगळे प्रकार घेत असतो. सध्या कोरोनाकाळात मी चहाचा नवा प्रयोग करुन पाहिलाय. ग्रीन टीमध्ये सुंठ पावडर, काळी मिरी, दालचिनी आणि विलायची टाकून मी चहा करतो. तिही दिवसातून तीन वेळा. हैदराबादला माझं लॉकडाऊनच्याआधी शूटींग होतं त्यावेळी तिथे मी हे सगळं घेऊन गेलो होतो. चहा माझ्यासाठी सध्या एका काढयाचं काम करतय. रिफ्रेशही होतो आणि इम्युनिटीही वाढतेच. मला चहाची सवय माझ्या बाबांमुळे लागली असावी. ते चहाप्रेमी होते आणि आता मीही चहाप्रेमी झालोय."

 

Recommended

PeepingMoon Exclusive