दिग्दर्शक: सौरभ सिन्हा
निर्माते : हितेशा देशपांडे, शोभिता मांगलिक आणि स्मिता तांबे
कलाकार: स्मिता तांबे, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव, श्वेतांबरी घुटे, शीतांशु शरद
वेळ: 2 तास
रेटींग : 2.5 मून आज आपण यंत्रयुगात जगून विज्ञानवादाच्या कितीही गप्पा मारल्या तरी समाजाचा काही भाग मात्र अंधश्रद्धेला घट्ट पकडून आहे. विशेषत: ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. सामाजिक असमानता, विज्ञान प्रसाराचा अभाव आणि नवीन संकल्पनेची वानवा यामुळे अंधश्रद्धेची पाळंमुळं अधिकच घट्ट होत जातात. सावट या सिनेमातून नेमकं यावरच भाष्य केलं आहे.
कथानक : एका गावात सात वर्षात सात आत्महत्या होतात. आणि ह्या सगळ्या आत्महत्या श्रावण महिन्यातच होतात. विशेष म्हणजे त्यातल्या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे. ह्या प्रत्येकानेच कोणाला तरी पाहिलंय. कोणाला? असं काहीसं गुंता या सिनेमात दिसून येतो. गावात होणा-या आत्महत्यांच्या कारणांचा शोध लावण्यासाठी मुंबई पोलिस दलातील अत्यंत धडाडीची अधिकारी आदिती देशमुखला (स्मिता तांबे ) या गावात पाठवलं जातं. प्रत्येक आत्महत्या झालेल्या जागेचा व्यवस्थित तपास करून आदिती आणि टीमच्या हाती कोणतं असं सत्य बाहेर पडतं हे पडद्यावर पाहणं थरारक आहे. स्मिता तांबे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेच शिवाय या सिनेमाची निर्माती पण आहे.
दिग्दर्शन सौरभ सिन्हा यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. सौरभ यांनी मांडलेलं कथानक नवं आहे. तांत्रिकदृष्ट्या जरी हा सिनेमा फार सफाईदार नसला तरी कथानक आणि कलाकारांच्या अभिनयाने हा सिनेमा अधिक खुलतो.
अभिनय अभिनयात मात्र हा सिनेमा उजवा ठरतो. हा सिनेमा संपुर्ण स्मितामय आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. पहिल्यांदाच अशी भूमिका करताना स्मिता तांबेने खूप तयारी केल्याचं जाणवतं. या भूमिकेच्या तयारीसाठी स्मिताने अनेक बाबी आत्मसात केल्या. केस-स्टडी चालू असताना तिची हातावर लिहायची स्टाइल डेव्हलप केली. तिचे वागणे मॅस्क्युलीन असेल, ह्यावर भर दिला आहे.
सिनेमा का पहावा? मराठीत सुपरनॅचरल थ्रिलर सिनेमांची संख्या खुप कमी आहे. त्यामुळे अशा गोष्टींचा थरार अनुभवण्याची आवड असलेल्यांनी हा सिनेमा जरूर पाहावा.