By  
on  

Picasso Review :  दशावतार कलाप्रकाराचं मूळ स्वरुप पाहण्याचा अविस्मरणीय अनुभव देतो #Picasso , प्रसाद ओकने सादर केली कोकणातल्या दशावताराची झलक 

चित्रपट – पिकासो

कलाकार – प्रसाद ओक, समय तांबे, अश्विनी मुकादम, विठ्ठल गांवकर, निळकंठ सावंत

दिग्दर्शक – अभिजीत वारंग

लेखक - अभिजीत वारंग, तुषार परांजपे

रेटिंग – 3.5 मून्स 

अमेझॉन प्राईम व्हिडीओ त्यांचा पहिला वहिला मराठी चित्रपट घेऊन आला आहे. त्यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट वेगळेपण सिद्ध करतोय. दशावताराची अनेक वर्षांपासूनची जुनी परंपरा आहे. अनेक चित्रपटांमध्ये दशावताराचे छोटे सीन किंवा त्याचा उल्लेख बहुदा पाहायला मिळाला आहे. मात्र दशावताराचा संपूर्ण खेळ दाखवणारा हा पहिलाच सिनेमा आहे. कोकणातलं लोकजीवन आणि दशावतार कलाप्रकारचं उत्तम सादरीकरण या चित्रपटात करण्यात आलं आहे. कोकणातल्या मातीत रुजलेला आणि वाढलेला दशावतार या चित्रपटात पाहणं एक वेगळा अनुभव ठरतं.

पांडुरंग गावडे ( प्रसाद ओक), त्याची पत्नी (अश्विनी मुकादम) आणि त्यांचा हुशार, गुणी मुलगा गंधर्व (समय तांबे) असा परिवार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. पांडुरंग हा दशावतारी खेळ सादर करण्यासोबतच मुर्तीकामही करतो. पांडुरंगला असलेली चित्रकलेची आवड मुलगा गंधर्वमध्येही आहे. म्हणूनच शाळेतील एका चित्रकला स्पर्धेत त्याचा पहिला क्रमांक येतो आणि पिकासो शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड होते. त्याला पिकासोचे मूळ असलेल्या स्पेनला जाण्याची संधी चालून येते. मात्र या स्पर्धेसाठी लागणारी फी गावडे परिवाराच्या आर्थिक परिस्थितीबाहेर आहे. तेव्हा आपल्या मुलासह चित्रकलेवरही नितातं प्रेम करणारा वडिल पांडुरंग आपल्या मुलाच्या स्पर्धेसाठी फी ची व्यवस्था कशी करतो हे क्षण भावुक करणारे आहेत. या सगळ्यात दशावताराच्या माध्यमातून या चित्रपटाचं कथानक खुलत जातं. मुलाची फी, पत्नीचं आजारपण आणि आर्थिक बिकटीची परिस्थिती असतानाही पांडुरंग हा दशावताराचे खेळ कसा रंगवतो हे या कथानकात पाहणं रंजक आहे.  

 अभिनेता प्रसाद ओक, बालकलाकार समय तांबे, अश्विनी मुकादम, विठ्ठल गांवकर, निळकंठ सावंत हे कलाकार या चित्रपटात आहेत. नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटातून एका वेगळ्या ढंगात पाहायला मिळतो. दशावतार सादर करणारा कलावंत त्याने उत्तम वठवला आहे. प्रसाद ओकची या भूमिकेसाठीची योग्य निवड आणि त्याचं या चित्रपटात असणं या चित्रपटाचं यश म्हणता येईल. बालकलाकार समय तांबेने गंधर्व नावाचा एक गोंडस, हुशार आणि गुणी मुलगा साकारला आहे. एका गरीब घरातील हुशार शांत स्वभावाचा मुलगा साकारण्याचा चांगला प्रयत्न त्याने केला आहे. त्याच्या चेहऱ्याची निरागसता आणि चित्रकलेत त्याला मिळणाऱ्या यशाने आई-वडिलांच्या चेहऱ्यावर येणार हसू पाहणं सुखावणारं आहे. अश्विनी मुकादम यांनी साकारलेली आई आणि पत्नीची भूमिका पाहून समाजातील आर्थिक चणचण भासणाऱ्या कुटुंबातील स्त्री डोळ्यासमोर उभी राहते. या दशावतारात सहभागी झालेल्या इतर कलावंतांनीही चांगली साथ दिली आहे.  


चित्रपट पाहताना कोकणातील मंदीरात त्या प्रेक्षकांमध्ये बसून दशावतार पाहण्याचा भास होत असल्याचं श्रेय चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग यांना जातं. चित्रपटाचा बहुतांश भाग हा दशावताराचा खेळ दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ते सिनेमारुपात कंटाळवाणं वाटू नये याची खबरदारी त्यांनी घेतल्याचं दिसतय. लेखनाच्या बाबतीत हा चित्रपट आणखी प्रयोग करु शकला असता तर हा प्रवास आणखी मनोरंजनात्मक झाला असता. कोकणातलं निसर्गरम्य वातावरण, कोकणातला पाऊस ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यामुळे सिनेमॅटोग्राफीने ती बाजू उत्तम सांभाळी आहे. मात्र त्यात जास्त काही प्रयोग न करता चित्रीत केल्याचं दिसतय आणि ते डोळ्यांना सुखावणारं आहे. चित्रपट संपादनही चांगलं झालय. 

चित्रपटात सुरुवातीची काही मिनीटे एकाच प्रकारचं सतत वाजणार बॅकग्राउंड संगीत मात्र खटकतं. संगीताची बाजू थोडी कमकुवत असल्याचं जाणवतं. याशिवाय चित्रपटाचा कालावधीही कमी आहे. 73 मिनीटांच्या या चित्रपटात कमी संवाद असल्याने थोडी निराशा होते. मात्र दशावताराचा खेळ सुरु असताना ते पाहण्यासाठी जमलेला समुदाय, प्रेक्षका हा तिथे उपस्थित असलेला खराखुरा प्रेक्षक असल्याचं जाणवतं. त्यामुळे ते चित्रपट रुपात नसून अस्सल आणि मूळ दशावतार पाहत असल्याचा अनुभव देतं. 
 दशावतारी कलाप्रकाराचा आणि ते खेळ सादर करणाऱ्या कलावंतांचा गौरव आणि सन्मान करणारा हा सिनेमा दशावतार कलाप्रकाराला समर्पित करण्यात आला आहे. दशावतार हा कलाप्रकार आणि त्याच्या सादरीकरणाचा अस्सल अनुभव हा चित्रपट देतो. त्यामुळे हा अविस्मरणीय अनुभव नक्कीच घ्या. 


 

Recommended

PeepingMoon Exclusive