By  
on  

Well Done Baby Review : अमृता खानविलकरच्या अभिनयाने वेधलं लक्ष, आदित्य-मीराच्या गुंतागुंतीच्या नात्याचा पालकत्वापर्यंतचा मजेशीर प्रवास

चित्रपट – वेल डन बेबी

कलाकार – अमृता खानविलकर, पुष्कर जोग, वंदना गुप्ते

दिग्दर्शक – प्रियांका तन्वर

लेखक -  मर्मबंध गव्हाणे

रेटिंग – 2.5 मून्स

एखादं जोडप त्यांच्या मतभेदामुळे वेगळं होण्याचा निर्णय घेत असेल मात्र त्यातच हे जोडपं आई-बाबा होणार कळल्यावर त्यांचं आयुष्य कसं बदलतं याचा रंजक प्रवास वेल डन बेबी या चित्रपटात मांडलाय.
मीरा (अमृता खानविलकर) आणि आदित्य (पुष्कर जोग) या जोडप्याची ही कहाणी आहे. लग्नानंतर दोघांच्या नात्यात मदभेद निर्माण होतात. यातच मीराची आई (वंदना गुप्ते) मुळे या नात्यात आणखी गुंतागुंत होऊ लागते. तरीही हे नातं टिकवण्याची त्यांची धडपड आहे. म्हणूनच हे नातं टिकवण्यासाठी ते एका डॉक्टरांचा सल्ला घेतात. मात्र तरीही या जोडप्याच्या नात्यातली गुंतागुंत काही केल्या कमी होत नाही. जेव्हा मीरा प्रेग्नेंट असल्याचं कळतं तेव्हा मात्र या जोडप्याचं आयुष्य बदलतं आणि पालकत्वाकडे वाटचाल करणारा या जोडप्याचा प्रवास सुरु होतो. मीरा आणि आदित्यच्या नात्यातली गुंतागुंत आणि त्यांचा पालकत्वापर्यंतचा प्रवास यात आहे. मीराचं बाळंतपण त्यानंतर तिच्या आणि आदित्यच्या आयुष्यात येणारे चढउतार या चित्रपटात पाहायला मिळतात.

अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात मीरा ही व्यक्तिरेखा साकारतेय. मीरा ही आईची लाडावलेली मुलगी आहे. कधी कधी बेजबाबदार वागणारी मीरा भाविनकही आहे. अमृताने मीराच्या व्यक्तिरेखेतील विविध छटा सहज सुंदरपणे सादर केल्या आहेत. अमृता ही मीराच्या भूमिकेत चांगलीच मुरली आहे. त्यामुळे मीराचं पात्र साकारण्यात ती यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळतय.

अभिनेता पुष्कर जोग या चित्रपटात आदित्य ही व्यक्तिरेखा साकारतोय. आदित्य हा एक मानसोपचारतज्ज्ञ आहे. एक स्वतंत्र आयुष्य जगणाऱ्या आदित्यचं आयुष्य लग्नानंतर बदलत जातं. मीरासोबतच्या नात्यातली चीडचीड आणि तिच्या आईच्या लुडबुडीमुळे आदित्य वैतागलेला आहे. पुष्करने आदित्य ही व्यक्तिरेखा उत्तम वठवली आहे. मात्र काही सीन्समध्ये पुष्करच्या पात्रातील अभिनयाचा कस कमी पडल्याचं जाणवतं. पुष्कर साकारत असलेल्या पात्राच्या चेहऱ्यावर सतत चिडलेला आणि वैतागलेला भाव, क्वचितच हसणाऱ्या आदित्यचं पात्र लिखाणात भरकटलय. 

अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या आईच्या भूमिकेने या चित्रपटात जीव ओतला आहे. त्यांचा विनोदी अंदाज आणि संवाद कौशल्याने हा चित्रपट अधीक मनोरंजक वाटतो. वंदना यांनी कॉमेडी सीन्सही अप्रतिम केले आहेत.   प्रत्येकाच्या आयुष्यातील आईचं महत्त्व याची जाणीव त्यांचं पात्र करुन देते. 


बाळंतपण आणि त्यासोबत पालकांची वाढत जाणारी जबाबदारी याचं चित्रण या चित्रपटात आहे. मात्र यातच काही मुद्दे खटकणारे आहेत. मीराच्या प्रेग्नेंसी दरम्यान आदित्यची उगाच सुरु असलेली चीडचीड प्रेक्षकांना खटकण्याची शक्यता आहे. चित्रपटाचा विषयही कुठेतरी भटकल्याचं जाणवतं. मुळ मुद्दा आणि त्याचा संदर्भ न जुळणारा वाटतो. चित्रपटाची तांत्रीक बाजू अतिशय कमजोर वाटते.
दिग्दर्शिका प्रियांका तन्वर यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. याआधी प्रियांका यांनी अनेक हिंदी प्रोजेक्ट्ससाठी काम केलं आहे. या चित्रपटात त्यांच्या दिग्दर्शनाने काही वेगळेपण जाणवेल अशी अपेक्षा होती. मात्र चित्रपट पाहताना ती अपेक्षा भंग होते. ही गोष्ट अधिक प्रभावीपणे मांडता आली असती असं जाणवतं. मर्मबंध गव्हाणे यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. एका जोडप्याच्या नात्यातील गुंतागुंत आणि त्यांचं पालकत्व हे या चित्रपटात एक रंजक वळण घेऊन येतं. मात्र बऱ्याच ठिकाणी मुळ मुद्दा आणि गाभा भटकल्याचं जाणवतं. कमजोर स्क्रिनप्ले आणि वाईट एडिटिंगमुळे हा चित्रपट लक्ष केंद्रीत करुन ठेवण्यात अपयशी ठरतो आणि काही वेळा हा प्रवास कंटाळवाणा वाटतो. मात्र अभिनेत्री अमृता खानविलकर, पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते यांचा अभिनय शेवटपर्यंत प्रेक्षकांना या कहाणीसोबत धरुन ठेवतोय. 

लंडनमधील सुंदर लोकेशन्स पाहणं छान वाटतं. ‘आई बाबा’ आणि ‘हलकी हलकी’ या दोन्ही गाण्यांची सिनेमॅटोग्राफी देखील लक्षवेधी ठरते. या चित्रपटाला रोहन एन्ड रोहन यांचं संगती लाभलय. चित्रपटातील गाणी आणि  संगीत श्रवणीय आहेत. चित्रपटात अनेक चांगले सीन्स आहेत, मात्र काही सीन्स खुलवण्यात बॅकग्राउँड स्कोर कमी पडलय.

'वेल डन बेबी' या चित्रपटातील कौटुबिक नाट्य हे मनोरंजनात्मक आहे. या चित्रपटातील आदित्य-मीराच्या नात्यात मतभेद असले तरी नात्यात असलेला गोडवा, मीराची व्लॉगर आई ही सगळी पात्र मनोरंजक वाटतात. शिवाय हा चित्रपट पालकत्वाचेही काही सल्ले सोबत घेऊन येतो. 

Recommended

PeepingMoon Exclusive