By  
on  

Dithee Review : जन्म-मृत्यूचं अतूट नातं आणि त्यात गोठलेलं दु:ख याचा प्रवास टिपणारा सुमित्रा भावे यांचा शेवटचा चित्रपट ‘दिठी’

चित्रपट – दिठी
कलाकार – किशोर कदम, मोहन आगाशे, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, अंजली पाटील, ओमकार गोवर्धन, कैलास वाघमारे
दिग्दर्शक – सुमित्रा भावे
लेखक – सुमित्रा भावे
निर्मिती – मोहन आगाशे

रेटिंग – 3.5 

संततधार पाऊस, गावातली घरं, खळाळत वाहणारी नदी, छपरांवरून ओघळणारं पावसाचं पाणी, काळोखातल्या चिमण्या, कंदील, शेत, चिखल या सगळ्यात आपण चिंब भिजून त्या कथेत आहोत असा भास क्वचितच चित्रपटांमध्ये आला असेल. ते चिखल अनवाणी तुडवत आपणही त्यात कुठेतरी ओलाव्याचा दरवळणारा सुगंध घेत आहोत असं जाणवतं ते दिठी हा चित्रपट पाहताना. प्रसिद्ध ताकदीच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. सोनी लिववर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

ही कथा सलग तीस वर्षे वारी करणारा लोहार रामजीची, जो विठू भक्त आहे. विठ्ठलावर अपरंपार प्रेम असलेल्या या वारकऱ्याच्या आयुष्यात असं काही घडतं ज्याने जन्म-मृत्यूच्या नात्याच्या विचारात तो सून्न होऊन जातो. रामजीच्या मुलाचा नदीत वाहुन मृत्यू होतो. मुलाच्या निधनाने त्याच्या आयुष्यालाच खीळ बसते. जेव्हा रामजीच्या मुलाचं निधन होतं त्याचवेळी रामजीच्या सूनेला कन्यारत्न प्राप्त होतं.  बाळ आणि सूनेचा तो द्वेष करू लागतो. आपल्या नातीला बघण्याचा मोहही त्याला होत नाही. सुन्न झालेला रामजी आपल्या वारीच्या आठवणींमध्ये गुंग होऊन जातो. मुलाचा चेहरा सतत त्याच्या डोळ्यासमोर येतो. गावकऱ्यांना सकारात्मक उपदेश देणाऱ्या रामजीची ही अवस्था त्याच्या सवंगड्यांनाही बघवत नाही. यातच गावातल्या एका घरात गाईच्या पोटी वासरु जन्माला येणार असतं. या सगळ्यात रामजीवर कोसळलेला दु:खाचा डोंगर, त्याचं अध्यात्म, सतत कोसळणाऱ्या पावसात निर्माण झालेली सुन्नता यात रामजीचं गोठलेलं दु:ख कसं वितळतं हा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आलाय.


 
दि. बा. मोकाशींच्या एका कथेवर आधारित हा चित्रपट आहे. ताकदीच्या कथेला न्याय देणारी दिग्दर्शिका या चित्रपटाला लाभलेल्या असल्यामुळे या चित्रपटात खरेपणा जाणवतो आणि आपणही या चित्रपटाचे भाग झालेलो आहोत हे उमगतं. सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट समर्थपणे अनुभव देऊल जातो. सुमित्रा भावे यांनी अद्वैताविषयीचा हा दैवी संवादच जणू इथे मांडलाय याची अनुभुती निर्माण होते. 19 एप्रिल 2021 रोजी सुमित्रा भावे यांचं निधन झालं. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. त्यातलाच 'दिठी' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरलाय.

ही कथा अनुभवताना सगळं काही उत्तम जुळून आलय असं जाणवतं. यात महत्त्वाचा भाग म्हणजे उत्तम कलाकारांची फळी. रामजीच्या भूमिकेत किशोर कदम यांनी जीव ओतून काम केलय. रामजीचं मुलाच्या निधनाचं दु:ख, त्यांचं सुन्न होणं हे अंगावर शहारा आणणारं आहे. किशोर कदम यांची देहबोली रामजीच्या पात्रात इतकी मिसळून गेलीय की क्षणोक्षणी ते रामजीच असल्याचं वाटतं. रामजीच्या पात्रातील बारकावे त्यांनी उत्तम टीपले आहेत.

मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर यांसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटाचा आत्मा आहेत असं जाणवतं. रामजीच्या सवंगड्यांच्या भूमिकेत ते आहेत. रामजी दु:खाच्या सागरात सुन्न झाल्याची परिस्थिती या सवंगड्यांना अस्वस्थ करतेय. हे सहज सुंदरपणे या कलाकारांनी मांडलय. कथेच्या प्रवासात ते समृद्ध करणारा अनुभव देतात. 

अभिनेत्री अमृता सुभाषचं अभिनय कौशल्य या चित्रपटातून एका वेगळ्या रुपात पाहायला मिळतं. आपल्या गाईवर माया करणारं जोडपं अमृता आणि शशांक शेंडे यांनी साकारले आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या या जोडप्याची आपल्या गाईसाठी होणारी तळमळ अस्वस्थ करणारी आहे. अमृता सुभाष आणि शशांक शेंडे यांचा अभिनय प्रशंसनीय आहे. अभिनेत्री अंजली पाटील रामजीच्या सुनेचं पात्र कमी संवादात हावभाव आणि देहबोलीने उत्तम सादर करते. 

ओमकार गोवर्धनने रामजीचा मुलगा साकारलाय. कमी सीनमधूनही तो रामजींच्या आठवणींमध्ये कसा जीवंत राहिलाय हे त्याच्या अभियातून उत्तम साकारतो. अभिनेता कैलास वाघमारेही गावकऱ्यांपैकी एक. त्याच्याही पात्रातील बारकावे त्याने उत्तम मांडले आहेत. मोजक्या पात्रातून मांडलेल्या या कथेतील खरेपणा, साधेपणा लक्ष वेधून घेणारा आहे.

या चित्रपटाची तांत्रिक बाजू फार महत्त्वाची आणि अतिशय ताकदीची आहे. न संपणारा पाऊस, अंधारातील दिव्यांचा प्रकाश, ओलावा, कथेतील पात्रांच्या भावना, बारकावे जीवंत करण्यात महत्त्वाचा हात आहे डीओपी धनंजय कुलकर्णी यांचा. या चित्रपटातील त्यांची सिनेमॅटोग्राफी कमाल ताकदीची आहे. प्रत्येक फ्रेम ही एक सुखद अनुभव देतं. जणू आपण या चित्रपटाचा भाग असल्याची जाणीव हा चित्रपट पाहताना होणं यात तांत्रिक बाजूचाही महत्त्वाचा वाटा आहे. साकेत कानेटकर यांचं पार्श्वसंगीत, पार्थ उमराणी यांच्या संगीतानेही चित्रपटाला उत्तम साथ दिली आहे. 
सुरुवातीपासूनच हा चित्रपट विविध दृष्यांनी, प्रसंगानी लक्ष वेधून घेतो. सतत कोसळणाऱ्या पावसाचा आवाज, निशब्द प्रसंग काही ठिकाणी कंटाळवाणी वाटू शकतात पण त्याचा अर्थ उमगल्यावर त्याविषयी कुतूहल निर्माण होतं.

विविध पुरस्कारप्राप्त 'दिठी' हा सुमित्र भावे यांचा चित्रपट थक्क करणाऱ्या अविस्मरणीय प्रवासात घेऊन जातो. जवळच्या व्यक्तिच्या मृत्यूला सामोरं जाण्याचा जीवघेण्या संघर्षाच्या प्रवासात आपलाही कंठ दाटून येतो. हा समृद्ध करणारा प्रवास ‘दिठी’ पाहून अनुभवणं हीच सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली ठरेल. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive