By  
on  

चुंबक : स्वप्न आणि माणुसकीच्या कचाट्यात सापडलेली एक हदयस्पर्शी गोष्ट

दिग्दर्शक : संदीप मोदी

कलाकार : स्वानंद किरकिरे, साहिल जाधव, संग्राम देसाई

वेळ : 1 तास 58 मिनिटे

रेटींग : 4 मून

सिनेमा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ती म्हणजे नायक व नायिकेची प्रेमकहाणी. हे दोघंच सिनेमात नेहमी मध्यवर्ती असतात. त्यानंतर त्यांच्या प्रेमात अडसर ठरणा-या व त्यांचे समर्थन करणा-या इतर व्यक्तिरेखा त्यांच्याभोवती गुंफण्यात येतात. मोठमोठी निसर्गरम्य लोकेशन्स, भारी सेट्स यांचा थाटमाट, दोन-तीन गाणी असं काहीसं प्रत्येक सिनेमात थोड्याफार फरकाने सारखचं असतं.

पण काही सिनेमे असेही असतात, जे पाहताना नकळत आपल्याला जगण्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन देऊन जातात. नुकताच प्रदर्शित झालेला चुंबक हा मराठी सिनेमा असंच काहीसं आपलं चाकोरीबाहेरचं वेगळेपण सिध्द करतो.

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने जेव्हा चुंबक सिनेमा पाहिला तेव्हा तो अक्षरश: त्याकडे चुंबकासारखाच आकर्षित झाला आणि त्याने हा सिनेमा प्रस्तुत करण्याचे पक्के केले. अक्षय कुमार प्रस्तुत चुंबक या मराठी सिनेमाची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. एका आगळ्या-वेगळ्या कथेवर हा सिनेमा बेतला आहे. काहीसा वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा असून आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी झटणा-या एका 15 वर्षीय मुलाचा हा प्रवास आहे.

कथानक 

मुंबईत एका हॉटेलात वेटरचं काम करणारा बाळू (साहिल जाधव) याचं एक स्वप्नं असतं. गावी जाऊन स्वत:चं रसवंतीगृह सुरू करण्याची इच्छा तो उराशी बाळगून असतो. आपलं हे छोटंसं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तो नेहमी पैसे साठवून ठेवतो. तो फार कष्ट करुन पै-पै जमवतो. पण अचानक एकदा असं काहीसं घडतं की, त्याने कष्टाने जमवलेले पैसे तो गमावून बसतो. याप्रसंगानंतर हताश झालेल्या बाळूला त्याचा जिवलग मित्र डिस्को (संग्राम देसाई) मानसिक आधार देतो. डिस्कोसुध्दा मुंबईत मोबाईल रिपेरिंगचं काम करुन आपला उदरनिर्वाह करत असतो. याप्रसंगाला डिस्को हा बाळूला धैर्याने सामोरे जायला शिकवतो. दुनियादारी काय असते हे पटवून देतो. पैसे परत मिळविण्यासाठी आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक वेगळा मार्ग अवलंबण्याची युक्ती देतो. याच मार्गावर या दोघांची गाठ सोलापूरहून आलेल्या आणि गतिमंद असलेल्या प्रसन्नासोबत (स्वानंद किरकिरे) पडते. त्याचं एक वेगळंच जग आहे. लॉटरी लागलीय,या आशेने तो गावाहून थेट मुंबईत आला आहे. इथूनच सुरू होतो, बाळू आणि प्रसन्नाच्या स्वप्नांचा प्रवास. प्रसन्नमुळे बाळूचं स्वप्नं कसं दावणीला लागतं, हे सिनेमात पाहाणं उत्कंठावर्धक ठरतं. परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेल्या दोन व्यक्तिरेखा सिनेमानंतर आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

दिग्दर्शन

सुरूवातीपासून प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक संदीप मोदी यांनी यश मिळवलं आहे. नेमक्याच कथानकाची पडद्यावर आखीव-रेखीव मांडणी करून योग्य तो संदेश पोहचवणं त्यांना छान जमलं आहे. सिनेमातील प्रत्येक प्रसंग हद्यस्पर्शी ठरतो. खुमासदार संवांद हे या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य.

 

अभिनय

गीतकार-लेखक आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांच्या सर्वोत्तम अभिनयाने हा सिनेमा फुलला आहे. त्यांच्या अभिनयाला कसलीच तोड नाही. साहिल जाधव आणि संग्राम देसाई या नवोदित कलाकारांच्या अभिनयाला दाद द्यायलाच हवी. साहिलने साकारलेला निरागस आणि आपल्या स्वप्नाच्या मागे धडपडणारा बाळू मनात कुठेतरी स्पर्शून जातो. तर मित्राला नेहमीच खंबीर साथ देणारा डिस्को ही भूमिका संग्रामने उत्तम साकारली आहे.

सिनेमा का पाहावा ?

आपण एन्टरटेन्मेंट करणारे, ड्रामाने भरपूर असे सिनेमे नेहमीच पाहतो. पण नेहमीपेक्षा एक वेगळी गोष्ट आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. स्वानंद किरकिरे यांनी साकारलेला प्रसन्ना ही व्यक्तिरेखा सिनेमात जीव ओतते. साहिल जाधव आणि संग्राम देसाई या दोन नवोदित कलाकारांनीसुध्दा त्यांच्या व्यक्तिरेखांमधून उत्तम साथ दिलीय व हीच या सिनेमाची जमेची बाजू ठरतेय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive