दिग्दर्शक : वैभव चिंचाळकर
कलाकार : मोहन जोशी, सुबोध भावे आणि गौरी महाजन
वेळ : 2 तास 13 मिनिटे
रेटींग : 2 मून
पुष्पक विमान म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते विठू माऊलीच्या भक्तीत लीन झालेल्या संत तुकारामांच्या वैकुंठगमनासाठी आलेले विमान. या विमानाच्या आख्यायिका आपण नेहमीच आपल्या वडिलधा-या मंडळींकडून ऐकल्या आहेत. म्हणून सिनेमाच्या नावावरुनच आपल्याला अंदाज येतो की हा सिनेमा विमानाशी निगडीत विषयावर बेतला आहे.पण यात आजोबा आणि नातू या दोन मध्यवर्ती व्यक्तिरेखांच्या भावनिक संबंधाचे चित्रण करण्यात आले आहे.
गावातील मंडळींना शहरी जीवनाचं नेहमीचं आकर्षण वाटत आलं आहे. शहरातील लहान-सहान गोष्टींचेसुध्दा त्यांना अप्रूप वाटते. आजोबा आणि नातू हे म्हटलं तर नाजूक म्हटलं तर घट्ट असं नातं. दोघांचेही भावनिक बंध या सिनेमात उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे म्हणावे लागेल. हा सिनेमा संपूर्णपणे कौटुंबिक आणि हद्यस्पर्शी कथानकावर बेतला आहे.
कथानक
गावात तात्या (मोहन जोशी) हे एकटेच राहतात. ते संत तुकारामांचे निस्सिम भक्त आहेत. संत तुकारामांची वैकुंठ गमन ही कथा नेहमीच त्यांना भुरळ पाडते. तुकारामांना नेण्यासाठी आलेल्या पुष्पक विमानाचे नेहमीच त्यांना आकर्षण वाटते. त्यांना एक मुंबईत राहणारा नातू आहे. वयोमनानुसार त्यांना विस्मरणात होते. नेहमीच ते आपल्या नातवाची आतुरतेने वाट पाहत असतात. पण तो कधी त्यांच्या भेटीला आला नाही.
एक दिवस अचानक त्यांचा नातू विलास (सुबोध भावे) गावी येतो. आजोबांसोबत गावच्या सुखद वातावरणात काही दिवस घालवल्यानंतर नातवाच्या आग्रहास्तव तात्या मुंबईत येतात. इथे मुंबईत विलासने लहान संसार थाटला आहे. चाळीतल्या खोलीत पत्नी स्मिता (गौरी महाजन)सोबत तो राहत असतो. परंतु तात्या आणि स्मिताचं कधी कुठल्याच गोष्टीवर एकमत होत नाही. त्यांच्यात नेहमीच लहान-सहान खटके उडतात. तात्यांचा जीव मुंबईत रमत नाही, त्यांना पुन्हा गावी परतण्याची ओढ लागली आहे. एकदा नातू आणि सुनेबरोबर मुंबई दर्शन करता करता तात्यांना आकाशात विमान उडताना दिसते आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. हे संत तुकारामांचे पुष्पक विमान असल्याचे ते मानतात आणि विलासकडे या विमानात बसण्यासाठी एखाद्या लहान मुलाप्रमाणे हट्ट करतात. पण त्यांची ही अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होते का? कशाचा सामना या कुटुंबाला या विमानप्रवासासाठी करावा लागतो? या सर्वांची उत्तरं आपल्याल्या सिनेमा पाहताना मिळतील?
दिग्दर्शन
दिग्दर्शक वैभव चिंचाळकर यांनी आजोबा नातवाची हद्यस्पर्शी गोष्ट पडद्यावर मांडण्यात ब-यापैकी यश आलं असलं तरी ही गोष्ट जरा जास्तच लांबणीवर गेली आहे. थोडक्यात ज्या गोष्टीत मजा येते तशी ही नाही. काही पात्रं आणि दृश्य उगीच वाढीव म्हणून जोडल्यासारखी वाटतात. त्यामुळे कथानक कंटाळवाणे वाटू लागते.
अभिनय
सिनेमातील कलाकारांनी आपल्या भूमिकांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मोहन जोशी नेहमीप्रमाणेच आपल्या सहज-सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्यांनी तात्या हुबेहुब पडद्यावर साकारले आहेत. नातवाच्या भूमिकेतील सुबोध भावेने त्यांना उत्तम साथ दिली असून अभिनेत्री गौरी महाजन हिचा पहिलाच सिनेमा असल्याने, अभिनयात तितकी सहजता जाणवली नाही.
संगीत
सिनेमातील संगीत आणि गाणी चांगली जमून आली आहेत. तरी काही गाणी अधिकच असल्याचे वाटू लागतात.
सिनेमा का पाहावा?
आजोबा नातवाची साधी सरळ गोष्ट आणि त्यात मोहन जोशी यांचा उत्कृष्ट अभिनय पाहायचा असेल तरच कुटुंबासमवेत तुमच्या विकेंडसाठी हा पर्याय असू शकतो.