By  
on  

June Review : आयुष्याचा शोध घेण्याच्या प्रवासातील धडपड आणि वेदना यातून सापडलेला सकारात्मक दृष्टीकोन, सिद्धार्थ – नेहाच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष 

चित्रपट – जून
कलाकार – सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे बायस, रेशम श्रीवर्धन, किरण करमरकर 
दिग्दर्शक – सुहरुद गोडबोले, वैभव खिस्ती
निर्मिती – अक्षय बर्दापुरकर, शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे बायस, निखील महाजन, पवन मालू  
लेखक – निखिल महाजन
रेटिंग – 3 मून्स

आयुष्याच्या प्रवासात आपणच आपला शोध घेत असतो, या प्रवासात अनेक अडथळ्यांसह अनोळखी चेहरेही भेटतात, ते कधी आयुष्याचा भाग होऊन एक सकारात्मकता देऊन जातात हे कळतच नाही. हीच सकारात्मकता म्हणजे एखाद्या जखमेवर कोणी हळुवार फुंकर मारणं. आयुष्याच्या प्रवासात होणाऱ्या जखमांवर हळुवार फुंकर मारली तर प्रवास सुखकर होतो. 'हिलींग इज ब्युटीफुल' ही टॅगलाईन घेऊन अशाच काही व्यक्तिरेखांच्या एका अनोळखी वाटेवरचा शोध घेणारा प्रवास 'जून' या चित्रपटात पाहायला मिळतोय. प्लॅनेट मराठी या पहिल्या वहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवात 'जून' या चित्रपटाच्या प्रदर्शनाने होत आहे. सुहरुद गोडबोले, वैभव खिस्ती दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे बायस, रेशम श्रीवर्धन, किरण करमरकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'जून'ने मोहोर उमटवली आहे. 

आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो की आपल्या शहराची शिकवण आणि आपलं शहर ही आपली ओळख बनून जाते. अशीच ओळख औरंगबादच्या नीलची आहे. औरंगाबादचा नील हा पुण्यात इंजिनियरींग शिकण्यासाठी जातो. कबाडकष्ट करून आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमा करणारे वडील आणि गृहिणी आई अशा मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या नीलसोबत असं काही घडतं ज्याने नीलच्या आयुष्यात वेगळाच बदल होते. इंजिनियरींगमध्ये नापास होऊन तो पुन्हा औरंगाबादमध्ये परततो. तर दुसरीकडे नेहा ही पुण्यातून आपल्या पतिच्या घरी औरंगाबादमधील एका कॉलनीत एकटीच राहु लागते. नेहाच्या आयुष्यातही असं काही घडलय ज्याने तिचं दु:खही गोठलय. या कथेत जेव्हा नील आणि नेहाची भेट होते तेव्हा कहाणीला एक वेगळं वलय प्राप्त होतं. विविध वळणावर घडणाऱ्या काही घटना आणि प्रसंग सुन्न करणारा अनुभव देतात. ज्यातून एका महत्त्वाच्या नाजूक विषयालाही हात घालण्याचा प्रयत्न केलाय.

अभिनेता सिद्धार्थ मेनन हा नीलच्या भूमिकेत झळकतोय. एका इंजिनियर विद्यार्थ्याची भूमिका त्याने उत्तम साकारलीय. अधीर स्वभावामुळे नील हा विविध टप्प्यांवर काही चूकाही करतो. याच नीलच्या पात्रातील बारकावे सिद्धार्थने उत्तम टिपले आहेत. विद्यार्थी दशेतला नील आणि त्याची हळवी बाजू याला सिद्धार्थने न्याय दिलाय. या चित्रपटाची सहनिर्माती अभिनेत्री नेहा पेंडसे बायस ही या चित्रपटातून मोठ्या कालावधीनंतर मराठी चित्रपटात झळकतेय. नेहाच्या भूमिकेतली सुन्नता, गोठलेलं दु:ख, तिचा बिनधास्तपणा तिने सहज सुंदर साकारलाय. नेहाचा काहीसा हटके लुकही या चित्रपटात लक्षवेधी ठरतोय. चित्रपटातील काही प्रसंगांमध्ये नील आणि नेहाची जवळीक पाहायला मिळते. ही जवळीक मैत्रीची ? प्रेमाची ? दोघांचं कोणतं नातं तयार होतं ? हे चित्रपटात पाहणं रंजक ठरतय. नील – नेहा मधील नात्याची उत्तम केमिस्ट्री कथेला न्याय देत असून प्रेक्षकांना खिळवून ठेवते. अभिनेत्री रेशम श्रीवर्धनने नीलची गर्लफ्रेंड निकी हे पात्र साकारलय. या पात्रात ती शोभलीय. अभिनेते किरण करमरकर नीलच्या वडिलांच्या भूमिकेत भाव खाऊन जातात. या पात्रातील वडिलांची प्रेमळ आणि कणखर बाजू त्यांनी उत्तम मांडलीय.

निखिल महाजन यांच्या लेखणीतून तयार झालेल्या या दु:ख, वेदना त्यातील प्रवासाच्या कथेला आणि व्यक्तिरेखांना जिवंत करण्याची धुरा सुहरुद आणि वैभव खिस्ती यांनी अतिशय सुंदररित्या सांभाळलीय.   चित्रपटातील प्रसंगाची अकल्पनीय सुरुवात आणि शेवट, काही अबोल संवादातील जादू त्यांच्या दिग्दर्शनातून जाणवतेय. अव्यक्त झालेल्या भावना आणि दु:ख यांना जेव्हा बांध फुटतो तेव्हा माणूस काय आणि कसा व्यक्त होतो याचं सूक्ष्म चित्रण या चित्रपटात पाहणं महत्त्वाचं ठरतय. एखाद्या शहराचं प्रतिबिंब हे त्या शहरात राहण्याऱ्या लोकांमध्ये जाणवतं. याचं निरीक्षण काही संवादातून सुंदर मांडण्यात आलय.

चित्रपट कंटाळवाणा वाटू शकतो असेही काही प्रसंग या चित्रपटात आहेत. ज्या प्रसंगांचा काही ठिकाणी परस्पर संबंध आहे पण काही काळानंतर ती दृश्ये नकोशी वाटू शकतात. मात्र ते प्रसंग त्या त्या पात्राची ओळख करुन देण्यात महत्त्वाची ठरतात. शिवाय चित्रपटाचं बॅकग्राउंड स्कोर तितकं प्रभावी वाटत नाही. त्यामुळे काही प्रसंग प्रभावी वाटण्यात कमी पडतात. 

जूनच्या निमित्ताने गायिका शाल्मली खोलगडे हिने म्युझिक कम्पोझर म्हणून पदार्पण केलय. निखील महाजन आणि जितेंद्र जोशी यांच्या सुंदर शब्दांना शाल्मलीने तिच्या संगीतातील सादरीकरणात वैविध्य आणलय. जूनच्या कथेला ट्रान्झिशन देण्यास गाण्यांची एक मोठी साथ मिळाली आहे. शाल्मली, अभय जोधपुरकर, असीम धनेश्वर, नेहा तावडे, आनंदी जोशी या गोड गळ्यांच्या गायक-गायिकांनी आपल्या सुरेल आवाजांनी चित्रपटाची गाणी श्रवणीय केलीत. या चित्रपटात विविध व्यक्तिमत्त्वांशी जोडलं गेलेलं औरंगाबाद शहर आणि त्याची खरी ओळख पाहायला मिळतेय. सिनेमॅटोग्राफर Quais Waseeq ने औरंगाबाद शहर कॅमेऱ्यात उत्तम टिपलं आहे. 

विविध वळणावर वेदनादायी वाटणाऱ्या या प्रवासाचा शेवट काहीसा वेगळा आहे. सिद्धार्थ मेनन आणि नेहा पेंडसेची उत्तम केमिस्ट्री, कथेचा महत्त्वाचा विषय, औरंगाबाद शहरातील गल्ली बोळ्याचे सुंदर चित्रण ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. हा प्रवास दु:ख, वेदना, राग, आनंद अशा अनेक भावनांचा अनुभव तुम्हाला देईल. हा अनुभव एकदा तरी नक्कीच घ्यायला हवा. 30 जून, 2021 रोजी 'जून' हा चित्रपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होतोय.

Recommended

PeepingMoon Exclusive