सिरीज – शांतीत क्रांती
स्ट्रीमिंग – सोनी लिव
दिग्दर्शन - सारंग साठ्ये, पॉला मॅकग्लिन
लेखन – अभय महाजन, अनुषा नंदकुमार, चेतन डांगे, सारंग साठ्ये
कलाकार – आलोक राजवाडे, अभय महाजन, ललित प्रभाकर, शिखा तलसानिया, सुहीता थत्ते, विजय निकम, सखी गोखले, मृण्मयी गोडबोले, सारंग साठ्ये, जितेंद्र जोशी, अमेय वाघ, पॉला मॅकगिलीन
रेटिंग - 3 मून्स
आपल्या खास मित्र-मैत्रिणींसोबतचा प्रवास हे वेगळे अनुभव देणारे असतात. अशा प्रवासाच्या आठवणी आणि अनेक अविस्मरणीय क्षणांच्या भावना शब्दांच्या पलीकडे असतात. असाच सुखद अनुभव ‘शांतीत क्रांती’ ही सिरीज पाहिल्यावर तुम्हाला येईल. ‘भाडिपा’च्या संयुक्त विद्यमाने संस्थापक सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन यांनी दिग्दर्शीत केलेली ही सिरीज एका अनोख्या प्रवासाचा अनुभव देते. ही फक्त तीन मित्रांची कथा नसून एका खास ट्रीपवर कळत – नकळत अंतरंगात शांतपणे डोकावल्यावर त्यांना झालेल्या आत्मपरिक्षणाचा साक्षात्कार आहे.
दिनार, श्रेयस आणि प्रसन्न हे तिघं लहानपणापासूनचे घट्ट मित्र आहेत. मनमौजी दिनार, आयुष्यात गोंधळलेला श्रेयस, शांत आणि फोकस असलेला प्रसन्न अशा विविध स्वभाव आणि विचारधारा असेलेल्या तीन मित्रांच्या खास ट्रीपची ही कथा आहे. एका धमाल ट्रीपला निघालेलं हे अतरंगी त्रिकूट अशा जागी येऊन पोहोचतात ज्याने त्यांच्या नव्या प्रवासासोबतच आयुष्याची दिशाही बदलते. शांतीवन या ठिकाणी पोहोचल्यावर या तिघांच्या विचारात काय परिवर्तन होतं आणि काय बदल होतात हा या सिरीजचा महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी ते कसे पोहोचतात ? तिथे या तिघांना कोण कोण भेटतं ? हे या सिरीजमध्ये पाहणं रंजक ठरतय.
अभिनेता आलोक राजवाडे या सिरीजमध्ये दिनार ही व्यक्तिरेखा साकारतोय. हवं तसं जगणारा आणि दारुच्या आहारी गेलेला दिनार त्याने उत्तम साकारलाय. अभय महाजनने साकारलेल्या श्रेयसच्या पात्राविषयीही शेवटपर्यंत उत्सुकता वाटू लागते. श्रेयसची विविध प्रसंग हाताळण्याची एक वेगळी शैली अभयने सहज सुंदर सादर केलीय. त्याच्या पात्रातील संवादातून तयार केलेले विनोद या सिरीजची शोभा वाढवतात. अभिनेता ललित प्रभाकरने पुन्हा एकदा त्याच्या कामातून सरप्राईज केलय. त्याने साकारलेला प्रसन्न हा एक स्विमींग ट्रेनर आहे. शांत पण खोडकर अशा प्रसन्नच्या भूमिकेत तो मुरलेला दिसतोय. ललित, अभय आणि आलोकची या सिरीजमधील केमिस्ट्री लक्ष वेधून घेतेय. तिघांच्या व्यक्तिरेखा भिन्न स्वभावाच्या असल्या तरी त्यांच्यातील घट्ट मैत्री विविध प्रसंगातून जाणवते यात या तिघांच्या उत्तम केमिस्ट्रीचा महत्त्वाचा वाटा आहे. शिखा तलसानिया ही बॉलिवुडमधील अभिनेत्री पहिल्यांदाच या सिरीजच्या निमित्ताने मराठीत काम करताना दिसतेय. तिचं या सिरीजमधील काम लक्षवेधी ठरतय. सुहीता थत्ते, विजय निकम, सखी गोखले, मृण्मयी गोडबोले, सारंग साठ्ये, जितेंद्र जोशी, अमेय वाघ, पॉला मॅकग्लिन आणि इतर कलाकारांचे स्पेशल अपियरन्सही या सिरीजचा महत्त्वाचा भाग आहेत. कथा पुढे सरकण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या कलाकारांनीही त्या त्या भूमिकेला उत्तम न्याय दिलाय.
दिग्दर्शनाच्या बाबतीत या सिरीजमध्ये प्रत्येक कलाकाराकडून काहीतरी वेगळं काढून घेण्याचा प्रयत्न जाणवलाय आणि तो योग्य वाटतो. उत्तम कलाकारांची निवड आणि त्यांनी साकारलेल्या पात्रांमधील बारकावे सारंग आणि पॉलाने छान सादर केले आहेत. अभय महाजन, अनुषा नंदकुमार, चेतन डांगे, सारंग साठ्ये यांनी या सिरीजचं लेखन केलय. या चारही लेखकांच्या लेखणीतून निर्माण झालेला हा प्रवास पाहणं अविस्मरणीय अनुभव ठरतो. निखील आरोळकरची सिनेमॅटोग्राफी चांगली वाटतेय. पण त्यातही आणखी प्रयोग करता आले असते तर काही सीन आणखी खुलले असते. सुशांत आमीनचं साउंड डिझाईन आणि सौरभ भालेरावचं संगीत या सिरीजची जमेची बाजू आहे. बॅकग्राउंड स्कोर आणि संगीताने काही संवाद आणि सीन खुलण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय. अपूर्वा सहाय आणि आशीष म्हात्रे यांचं एडिटींग या सिरीजचं सौंदर्य आणखी खुलवतं. तर श्रुतीका भोसलेचं कॉश्यूम स्टायलिंग छान वाटतय.
सहा भागांच्या या सिरीजमधील सुरुवातीचे काही भाग मूळ विषयांपर्यंत पोहोचण्यासाठी बराच काळ घेत असल्याचं जाणवतं. सुरुवातीचे भाग कंटाळवाणे वाटू शकतात. काही सीनमधील हिंदी संवादही उगाचचे आणि नकोसे वाटतात. मात्र काही भागांनंतर सुरु झालेला हा प्रवास अगदी शेवटापर्यंत खिळवून ठेवणारा आणि रोमांचकारी आहे.
मैत्रीचे धमाल, विनोदी आणि भावनिक क्षण या सिरीजची शोभा वाढवतात. धकाधकीच्या संघर्षमय जीवनात ही सिरीज नक्कीच मनशांती घेऊन येईल यात शंका नाही. हा सिनेमा पाहताना ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दिल चाहता है’ हे सिनेमे आठवतील पण या कथेतील आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान कोण हे तुम्हीच ठरवा...