By  
on  

Kaasav Review : नैराश्येच्या अंधारात आशेचा किरण दाखवणारी गोष्ट

चित्रपट – कासव
कलाकार – इरावती हर्षे, आलोक राजवाडे, किशोर कदम, मोहन आगाशे, देवीका दफ्तरदार, संतोष रेडकर, ओमकार गाडी
दिग्दर्शक – सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर
लेखन -  सुमित्रा भावे
स्ट्रीमिंग – सोनी लिव
रेटिंग -  4 मून्स

माणसाच्या मनातील एकटेपणाचा शोध एका दुसऱ्या एकट्या माणसापर्यंत जाऊन कसा पूर्ण होतो याचं चित्रण ‘कासव’ सिनेमात पाहायला मिळत. नैराश्येच्या अंधारात आलेला आशेचा किरण आणि त्याची वेळीच जाणीव होणं, किंवा ती जाणीव कुणीतरी करुन देणं याचं महत्त्व या चित्रपटातून पटतं. नैराश्य, आत्महत्या, मानसीक आजार यावर उत्तम आणि योग्य भाष्य करणारा हा एक महत्त्वाचा मास्टरपीस सिनेमा सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्गज जोडगोळीने  दिलाय. या दोघांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून लेखन, कथा, पटकथा सुमित्रा भावे यांच्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेला ‘कासव’ हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला असला तरी अनेकांचं हा सिनेमा पाहणं राहुन गेलय. म्हणूनच आता सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलाय.

जानकी, नीश (मानव), दत्ताभाऊ, बाबल्या, परशा अशी महत्त्वाची पात्रे या सिनेमात आहेत. एकटेपणा आणि नैराश्यातून कंटाळून  भावनाविरहीत होत जाणारा मानव हा घरातून पळून जाऊन भटकत राहतो. कुठे जायचय, कशासाठी, कुणासाठी आणि का ? याचा काहीच ठावठिकाणा नसलेला मानव आत्महत्येचा प्रयत्न करतो. त्यानंतर तो कुठे जातो हे त्यालाही कळत नसतं. कित्येक दिवस उपाशी, खिशात दमडी नाही, आंघोळ नाही अशा अवस्थेतला मानव एका ठिकाणी विचीत्र अवस्थेत जानकीला सापडतो. जानकी त्याला कोकणातील तिच्या घरी घेऊन जाते. यानंतर मानव उर्फ नीशच्या अंधारमय आयुष्यात जानकी नावाचा प्रकाश कसा मार्ग तयार करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.

अभिनेत्री इरावती हर्षे या क्वचीतच चित्रपटांमधून झळकतात पण जेव्हा स्क्रिनवर येतात तेव्हा तेव्हा त्यांचं काम लक्षवेधी ठरतं. या चित्रपटात त्यांनी जानकी ही व्यक्तिरेखा सहज सुंदर साकारलीय. स्वत: नैराश्य आणि एकटेपणाशी झुंज देणारी व्यक्ती दुसऱ्या एका एकट्याला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा कशी वागू शकते, कशी बोलू शकते हे जानकीच्या रुपात आणि तिच्या पात्रातून प्रसन्न करणारं आहे. मानव उर्फ नीशच्या भूमिकेत आलोक राजवाडे योग्य वाटतो. कधी भावनाविरहीत, कधी ओसंडून वाहणाऱ्या भावना तर कधी एकटेपणाचा गुंता सोडवतानाची मानवची घालमेल त्याने उत्तम साकारलीय. किशोर कदम, मोहन आगाशे, देवीका दफ्तरदार, संतोष रेडकर, ओमकार गाडी या कलाकारांनी त्यांच्या पात्रातून उत्तम साथ दिलीय. मोहन आगाशे यांनी साकारलेले दत्ताभाऊ देखील प्रत्येक दृश्यातून लक्ष वेधून घेतात. प्रत्येक कलाकाराची एक वेगळी शैली पण ती चित्रपटाचा विषय ताकदीने समोर आणते. 

प्रत्येक संवाद, शांतता, दृष्ये, फ्रेमिंग, लाईट्, संगीत या तांत्रीक बाजूंचा उत्तम मिलाप सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्गज मंडळींनी पुन्हा एकदा या चित्रपटातूनही घडवून आणलाय. पटकथेत गुंतागुंत नसल्याने तो सुटसुटीतपणा एकटेपणाचा गुंता आणखी स्पष्टपणे दाखवतो. 

धनंजय कुलकर्णी यांच्या सिनेमॅटोग्राफीने चित्रपटात जीव ओतलाय. मोहित टाकाळकर यांचं चोख एडिटिंग, साकेत कानेटकर यांचं संगीत विषयाला खोलवर हात घालतं. 
कोकणातील नयनरम्य, समृद्ध करणारी दृष्ये पाहताना प्रसन्न वाटतं

या सिनेमातून घेण्यासारखं खूप आहे. प्रत्येक जण काहीना काही नवं घेऊन जातो. काही संवादातून तर काही दृष्यातून हा सिनेमा बरच काही सांगून जातो. सुमित्रा भावे यांच्या निधनानंतर त्यांच्या सिनेमापैकी नाजूक विषयाला वेगळ्या पद्धतिने समोर आणणारा ‘कासव’ हा मास्टरपीस त्यांच्याकडून प्रेक्षकांसाठी एक मोठी भेटवस्तू आहे जी कायम ह्दयाच्या कपाटात कायम जपून ठेवली जाईल.  

Recommended

PeepingMoon Exclusive