चित्रपट – जयंती
कलाकार – ऋतुराज वानखेडे, तितिक्षा तावडे, मिलिंद शिंदे, किशोर कदम, वीरा साथीदार, पॅडी कांबळे, अमर उपाध्याय, अंजली जोगळेकर, अतुल महाले
दिग्दर्शक-लेखक – शैलेश नरवाडे
रेटिंग – 2.5 मून्स
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात अनेक महापुरुषांचे महत्त्वाचे योगदान आणि बलीदान लाभलय. मात्र त्यांच्या कार्याचा गौरव किंवा त्यांच्या जयंती साजरा करण्यात आलेलं राजकीय वलय यावर भेदक प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणजे ‘जयंती’. शैलेश नरवाडे लिखीत, दिग्दर्शित या चित्रपटाचा विषय हा महत्त्वाचा आणि लक्षवेधी ठरणारा आहे.
चित्रपटाची कथा आहे संतोष उर्फ संत्याची. स्वत:ला छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आणि मावळा समजणाऱ्या संतोषच्या आयुष्यात कोणतेच ध्येय नाही. मात्र महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यासाठी संत्या आणि त्याचे मित्र मात्र वस्तीत वर्गणी गोळा करण्याता अग्रेसर असतात. वस्तीतल्या टपरीवर बसून मित्रांसोबत गोंधळ करणारा संत्या हा आमदाराचा कार्यकर्ता आहे. मात्र संत्याचा गोंधळ, मारामारी, भांडणं यामुळे वस्तीतल्या लोकांसह त्यांचा परिवारही कंटाळला आहे. मात्र एक घटना संत्याचं आयुष्य बदलते. वस्तीतील मोलकरणीचं काम करणाऱ्या महिलेवर तिच्या मालकाकडून बलात्कार करुन खून करण्यात येतो. या सगळ्यात संत्या असं काही पाऊल उचलतो ज्यामुळे त्याला पोलीस पकडून तुरुंगात नेतात. तुरुंगात गेल्यानंतर संत्याच्या आयुष्यात काय घडतं ? महापुरुषांच्या विचारांमुळे त्याचं आयुष्य कसं बदलतं ? हे या चित्रपटात पाहणं महत्त्वाचं ठरतं.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत विविध महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात, शाटात साजऱ्या केल्या जातात. पण त्यांची शिकवण, त्यांचे विचार समाजात पसरवणं हे किती गरजेचं आहे हे चित्रपट पाहताना क्षणोक्षणी भासतं. चित्रपटातील अनपेक्षित वळणही मनोरंजक आहे.
अभिनेता ऋतुराज वानखेडे आणि मराठी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अभिनेत्री तितिक्षा तावडे या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. संपूर्ण चित्रपटाची धुरा मोठ्या प्रमाणात संत्याची भूमिका साकारणाऱ्या ऋतुराज वानखेडेच्या खांद्यांवर आहे. असं असलं तरी इतर कलाकारांची उत्तम साथ या चित्रपटात आहे. ऋतुराजने याआधी विविध नाटकांमध्ये काम केलय. त्याच्या अभिनयातून सहजपणा जाणवतो. त्याची शरीरयष्ठी, व्यक्तिमत्त्व पहिल्याच चित्रपटात लक्ष केंद्रीत करतय. तर दुसरीकडे पल्लवीच्या भूमिकेतून तितिक्षा तावडेही लक्ष वेधून घेतेय. ऋतुराज आणि तितिक्षा यांची जोडीही फ्रेश वाटतेय. मिलिंद शिंदे, किशोर कदम, पॅडी कांबळे या कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटात जीव ओतलाय. त्यांचे विशेष कौतुक.
मास्तरांच्या भूमिकेत मिलिंद शिंदे एका शिक्षकाची अशिक्षीत मुलाच्या अनभिज्ञपणामुळे झालेली निराशा, तळमळ, काळजी त्यांच्या भूमिकेतून चोख पार पाडलीय. आमदाराच्या भूमिकेत किशोर कदमही लक्ष वेधून घेतात. अमर उपाध्याय, अंजली जोगळेकर, अतुल महाले यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. वीरा साथीदार यांचीही महत्त्वाची भूमिका या चित्रपटात पाहायला मिळते. संत्याच्या मित्रांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी उत्तम साथ देत विनोदी सीन्समध्ये छान काम केलय.
चित्रपटाचं लेखन चांगलं असलं तरी दिग्दर्शन कमजोर वाटतंय. असं असलं तरी चित्रपटातील कलाकारांनी अभिनयाची बाजू सक्षम केलीय. काही सीन्स कंटाळवाणे वाटू शकतात. काही दृश्ये विनाकारण वेळ भरून काढणारी वाटतात. तर काही संवादही वेळ भरून काढणारे वाटतात.
चित्रपटाचं संगीत आणि गाणी श्रवणीय आहेत. मंगेश धाकडे आणि रुही यांनी छान संगीत दिलय. गुरु ठाकूर, केशव गजभिये आणि वैभव चौधरी यांचे गीत, प्रसिद्ध गायक जावेद अली यांनी गायलेली गाणी लक्षवेधी ठरतात. चित्रपटाचं संकलन आणखी चांगल्या पद्धतिने झालं असतं तर चित्रपटात सलगता आली असती. योगेश कोळी यांचे छायांकन छान झालय. तांत्रीकदृष्ट्या हा चित्रपट काही ठिकाणी कमी पडल्याचं जाणवतं.
महापुरुषांचे भक्त म्हणवून घेण्यापेक्षा त्यांच्याविषयीची माहिती जाणून घेऊन आणि त्यांचे विचार आत्मसाद करून त्यांचे विचार समाजात पेरण्यास कशी मदत होऊ शकते हा चित्रपटाचा आशय महत्त्वाचा वाटतो. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची उदाहरणं देत, त्यांचा उल्लेख करत स्पष्टपणे मांडण्यात आलय. सध्याच्या तरुण पिढीला या महापुरुषांच्या जयंतीचं खर महत्त्व पटवून देणारा हा चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे.