सिरीज – अनुराधा
स्ट्रीमिंग – प्लॅनेट मराठी
दिग्दर्शन – संजय जाधव
लेखन – संजय जाधव
कलाकार – तेजस्विनी पंडित, सचित पाटील, सोनाली खरे, सुकन्या मोने, संजय खापरे, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, सुशांत शेलार, आस्ताद काळे, संजय कुलकर्णी, नीता पेंडसे, वृषाली चव्हाण, चिन्मय शिंतरे, शाल्मली टोळ्ये, विजय अंदलकर, शुभांगी तांबळे, माधव देवचके
रेटिंग - 3.5 मून्स
एका मनोरंजक क्राईम सस्पेन्स थ्रिलर सिनेमा किंवा सिरीजसाठी काय हवं असतं ? तर प्रेक्षकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा. आणि जर अशी कथा असेल त्यात दमदार अभिनयाची साथ असेल तर असे प्रयत्न यशस्वी होतात. अशीच एक रंजक सस्पेन्स थ्रिलर सिरीज आहे ‘अनुराधा’. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव दिग्दर्शित आणि लिखीत ही कथा शेवटपर्यंत लक्षवेधी ठरणारी आहे. त्याची मुख्य कारणं जाणून घेऊयात..
ही कथा आहे अनुराधाची आणि तिचा प्रियकर वकील शंतनू यांची. या कथेत अनेक पात्र आहेत जे विविध टप्प्याला समोर येतात. अनुराधा आणि शंतनू यांच्यातील प्रेमाचं नातं खुलत असतानाच अचानक एकामागोमाग एक होणाऱ्या खूनांचा तपास घेत असताना पोलीसांना अनुराधावर संशय येतो. अनुराधाला नंतर अटकही करण्यात येते ज्यात स्वत: शंतनू तिच्या बाजुने केस लढताना दिसतो. तर शंतनूची जवळची मैत्रीण वकील निशा त्याच्याविरोधात ही केस लढताना दिसते. या सगळ्यात एकामोगामाग होणारे खून, अनुराधाला सतत वाटणारी भिती, या केसमध्ये विविध पात्रांचा सहभाग या सगळ्यात ही कथा रंजक वाटू लागते. तेव्हा शंतनू अनुराधाला या संकटातून वाचवू शकेल का ? त्यासाठी तो काय करेल ? खरच अनुराधा या खूनांमध्ये सहभागी आहे का ? या प्रश्नांची उत्तर या सिरीजमधील विविध भागांमधून उलगडत जातात. या सिरीजच्या प्रमोशन दरम्यान बॅन लिपस्टीक कॅम्पेन का करण्यात आलं होतं याचही उत्तर सिरीजमध्येच आहे.
संजय जाधव यांच्या दिग्दर्शनातील बारकावे या सिरीजची महत्त्वाची बाजू आहे. कथेतील सस्पेन्स आणि थ्रिलरचा गुंता त्यांनी उत्तम पद्धतिने सादर केलाय. सिरीजमधील प्रत्येक पात्रातील बारकावे आणि त्यामागचा इतिहास सखोल पद्धतिने मांडलाय. त्यातून प्रत्येक पात्राची उत्तम ओळख होते आणि ते या कथेत कशे जोडेल गेलेत याचा अर्थ उमगतो. प्रत्येक कलाकाराकडून काहितरी वेगळं काढून घेण्याचा उत्तम प्रयत्न संजय जाधव यांनी केलाय.
अनुराधासाठी तेजस्विनी पंडितची योग्य निवड असल्याचं क्षणोक्षणी जाणवतं. सुरुवातीच्या सीन पासून अगदी शेवटच्या सीनपर्यंत अनुराधा ही कोण आहे ? कशी आहे ? अशी का वागतेय ? हे सिरीजमध्ये हळूहळू उलगडत जात असताना त्यातील बारकावे सहजपणे समोर आणण्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडितने कोणतीच कसर सोडली नाहीय. ती या भुमिकेत किती आणि कशी मुरलीय हे सिरीज पाहताना जाणवतं. अनुराधा हे मुख्य पात्र साकारणाऱ्या तेजस्विनी पंडितचा हा आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय म्हणता येईल. अनेक थरारक सीन्समध्ये तेजस्विनीने तिचं अभिनयकौशल्य पणाला लावलय. फक्त बोल्ड लुक्स नाही तर त्या लुकला साजेसा अभिनय यांचा उत्तम संगम जुळून आलाय. या सिरीजमधील अभिनयासाठी तेजस्विनी नक्कीच विविध पुरस्कारांची मानकरी ठरेल.
सिरीजमधील प्रत्येक पात्रे महत्त्वाची आहेत. सचित पाटीलने साकारलेल्या शंतनुचा कथेतील सस्पेन्स टिकवण्यात मोठा वाटा आहे. अभिनेत्री सोनाली खरे ही वकील निशाच्या भूमिकेत लक्ष वेधून घेतेय. ही भूमिका सोनालीने छान पार पाडलीय. इन्स्पेक्टर चंदाच्या भूमिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकरने लक्षवेधी काम केलय. अभिनेता संजय खापरे यांनीही पोलीस अधिकारीची भूमिका चोख पार पाडलीय. सुकन्या मोने, विद्याधर जोशी, सुशांत शेलार, आस्ताद काळे, संजय कुलकर्णी, नीता पेंडसे, वृषाली चव्हाण, चिन्मय शिंतरे, शाल्मली टोळ्ये, विजय अंदलकर, माधव देवचके या कलाकारांची विविध पात्र या सिरीजमध्ये लक्षवेधी ठरतात. अभिनेत्री शुभांगी तांबळेच्या अभिनयाचही विशेष कौतुक.
अपुर्वा मोतीवले सहाय आणि आशिष म्हात्रे यांचं एडिटिंगही सुटसुटीत झालय. पंकज पडघन यांचं संगीत सिरीजमधील थ्रील कायम ठेवण्यात यशस्वी ठरलय. संजय जाधव यांचं छायांकन उजवं ठरलय.
ही सिरीज काही बाबतीत कमी पडलेली देखील जाणवते. सध्या ओटीटीवर शिव्या, धुर्मपान या गोष्टी मोठ्या प्रमाणात असतात. या सिरीजच्या बाबतीत त्या काही प्रमाणात टाळता आल्या असत्या तर काही सीन्स आणखी खुलले असते. बहुतांश पात्रांचे धुर्मपान करतानाचे आणि शिवीगाळ करतानाचे सीन्स अनेक ठिकाणी कंटाळवाणे वाटतात. काही ठिकाणी इंग्रजी भाषेतील संवादही नकोसा वाटतो. असे सीन्स वेळखावू वाटतात. या सिरीजचे सात भाग असून सुरुवातीचे भाग मंद गतीने पुढे जातात. शेवटच्या चार भागांनी रंजक वळण घेतलं असून त्यांनी चागला वेग धरलाय.
पटकथा ही काही प्रमाणात धक्के देणारी आहे मात्र काही ठिकाणी आपण अचूक अंदाज बांधून पुढे काय होईल हे देखील ओळखू शकत असलो तरी विविध सीन्समधून सस्पेन्स थ्रिलरचा थरार कायम ठेवण्यात चांगलं यश आलय. सिरीजमधील काही कोर्ट सीन छान खुलवण्यात आलेत.
मराठीत सिरीजमध्ये झालेला क्राईम सस्पेन्स थ्रिलरमधील हा वेगळा प्रयत्न लक्षवेधी ठरणारा आहे. शिवाय एक हटके ट्विस्टसोबत ही सिरीज एक दमदार स्टारकास्टसह हा रंजक थ्रिलर अनुभव देते.