चित्रपट – पावनखिंड
दिग्दर्शक – लेखक : दिग्पाल लांजेकर
कलाकार – चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, हरीश दुधाडे, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, अजिंक्य नानावरे, आस्ताद काळे, समीर धर्माधीकारी, क्षिती जोग, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, सचिन भिलारे, बिपीन सुर्वे, शिवराज वायचळ, विक्रम गायकवाड, सचिन भिलारे
रेटिंग - 4 मून्स
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा, त्यांच्या मावळ्यांची त्यांच्यावर असलेली निष्ठा याची प्रचिती देणारा पावनखिंडीतील पराक्रमी बांदल सेनेने दिलेला थरारक लढा आणि त्याचा इतिहास सर्वक्षुत आहे. मात्र पावनखिंडीविषयी अनेकांना माहिती असलेल्या इतिहासातील हे सुवर्णपान पडद्यावर जिवंत करण्याचं उत्तम काम पावनखिंड हा चित्रपट करतोय. पावनखिंडीचा उल्लेख येताच बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव अनाहूतपणे समोर येतच. याच शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि इतर बांदल सेनेच्या प्रराक्रमाची गाथा या चित्रपटात पाहायला मिळते. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक या संकल्पनेतून फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटानंतर पावनखिंड हा तिसरा चित्रपटही लक्षवेधी ठरतोय. लेखनासह दिग्पालने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे.
ज्या काळरात्री बाजीप्रभू देशपांडे यांनी फुलाजीप्रभू, रायाजीराव बांदल आणि 300 बांदल सेनेच्या साथीने घोडखिंड अडवून धरली आणि जणू रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत, अखेरच्या श्वासापर्यंत गनिमांची वाट रोखून ठेवली त्या लढ्याची गाथा या चित्रपटाची कहाणी आहे. हा थरारक लढा मोठ्या पडद्यावर पाहताना अंगावर काटा आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहात नाहीत. हा थरारक लढा अतिशय उत्कृष्ट पद्धतिने विविध बारकाव्यांसह चित्त थरारक अनुभव देतो. शिवकालीन भव्य गड-किल्ले, कोसळणाऱ्या पावसातील युद्धाची दृश्ये एक थरारक अनुभव देतात.
अभिनेता चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, हरीश दुधाडे, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, अजिंक्य नानावरे, आस्ताद काळे, समीर धर्माधीकारी, क्षिती जोग, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, सचिन भिलारे, बिपीन सुर्वे, शिवराज वायचळ, सचिन भिलारे अशा उत्कृष्ट कलाकारांची फौज या चित्रपटाला लाभली आहे.
फर्जंद आणि फत्तेशिकस्त या ऐतिहासिक चित्रपटांमधून शिवराज अष्टक आणण्याच्या प्रवासातील पावनखिंड या तिसऱ्या चित्रपटात तांत्रिकदृष्ट्या वेगळेपण आणण्याचा उत्तम प्रयत्न दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टीमने केलेला आहे. दिग्पालचे मागील हे दोनही चित्रपट पाहिलेल्यांना तो फरक जाणवेल. चित्रपटाची पटकथा उत्कृष्ट असल्याने विविध दृश्ये आणि संवाद ऐकताना रोमांच उभे राहतात.
अनेक उत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला उत्कृष्ट सीन आणि ताकदीच्या भूमिका आल्या आहेत. अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे पात्र साकारतोय तर मृणाल कुलकर्णी पुन्हा राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत झळकतायत. या दोन्ही कलाकारांच्या कामाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. त्यांच्या भूमिकांमधील बारकावे आणि छटांमधून पडद्यावर या भूमिका जिवंत झाल्यात. अभिनेता अजय पूरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे साकारले आहेत. त्यांचं चित्रपटातील काम अतुलनीय आहे. बाजीप्रभूंच्या पात्रासाठी लागणारी शरीरयष्ठी आणि व्यक्तिमत्त्वाचं दर्शन त्यांनी सांकारलेल्या पात्रातून हुबेहुब जाणवतं. युद्धाच्या दृश्यांमधील त्यांचं काम अंगावर काटा आणणारं आहे. त्यांनी साकारलेल्या या पात्रासाठी त्यांच्या कामाची पुढील काळात दखल घेतली जाईल एवढं नक्की. अभिनेता अंकित मोहन रायाजीराव बांदलच्या भूमिकेत त्यांच्या उत्तम शरीरयष्ठीने लक्ष वेधून घेतो. शिवाय युद्धांच्या दृश्यातूनही थरार निर्माण करतो. कोयाजीराव बांदल यांच्या भूमिकेतील अक्षय वाघमारेचही काम लक्षवेधी ठरतय. बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेतून अभिनेता हरीश दुधाडेचा सहज अभिनय लक्ष वेधून घेणारा आहे. वैभव मांगले, अजिंक्य नानावरे, आस्ताद काळे, समीर धर्माधीकारी, क्षिती जोग, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, सचिन भिलारे, बिपीन सुर्वे, विक्रम गायकवाड, शिवराज वायचळ या कलाकारांनीही चोख काम केलय. अजिंक्य नानावरे, आस्ताद काळे, प्राजक्ता माळी या कलाकारांच्या कामाचंही विशेष कौतुक.
तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट उजवा आहे. पार्श्वसंगीत ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू. ज्याने युद्धाची दृश्ये जणू अंगावर येतात. चित्रपटाचं चित्रीकरण पावनखिंडीतच झाल्यानं छायांकनाच्या बाबतीतही छान काम झालय. जे अमोल गोले यांनी केलय. या चित्रपटाचे संकलक प्रमोद कहार यांचे मागील वर्षी कोरोनाने निधन झाले. मात्र त्यांच्या उत्तम संकलनातून त्यांनी ही कलाकृती त्यांच्या कामाच्या आठवणीची भेट आहे. देवदत्त बाजी यांच्या संगीताने चित्रपटातील काही दृश्यांमध्ये जीव ओतलाय. मात्र पावनखिंडीतील युद्धाच्या दृश्यातील कालावधी आणखी वाढवला असता तर ते पाहणं आणखी रोमांचकारी वाटले असते.
छत्रपत्री शिवाजी महाराज आणि शिवकालीन शूरवीरांच्या शौर्यगाथेचा हा इतिहास मोठ्या पडद्यावर पाहताना छाती अभिमानाने फुलुन येते. एक विलक्षण अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहा.