चित्रपट – मी वसंतराव
दिग्दर्शक – निपुण अविनाश धर्माधिकारी
कलाकार – राहुल देशपांडे, अनिता दाते केळकर, पुष्कराज चिरपुटकर, अमेय वाघ, सारंग साठ्ये, कुमुद मिश्रा, कौमुदी वालोळकर, दुर्गा जसराज, आलोक राजवाडे, शकुंतला नागरकर
संगीत – राहुल देशपांडे
रेटिंग - 4 मून्स
“या जगातलं सगळ्यात मोठं दु:ख काय आहे माहितीय ? आपल्याला गायचं असणं पण समोरच्याला ते ऐकायचं नसणं हे सुद्धा एक दारिद्र्यच आहे...” ‘मी वसंतराव’ चित्रपटातील मास्टर दिनानाथ मंगेशकर या पात्रातील हे वाक्य अनेक कलाकारांच्या आयुष्यातील त्यांनी अनुभवलेला चढउतार सांगणारं आहे.
डॉ. वसंतराव देशपांडे हे भारतीय शास्त्रीय गायनातील एक मोठं नाव. आपण त्यांची गाणी ऐकलीत, त्यांचा जादुई आवाज ऐकलाय, त्यांच्याविषयी बरच ऐकलय, वाचलय, पाहिलय. मात्र या अवलियाचं आयुष्य कसं होतं, ते कलाकार म्हणून कसे घडत गेले हे ‘मी वसंतराव’ या चरित्रपटातून पाहायला मिळतं. एका खडतर आयुष्यातून तयार झालेल्या अद्भुत कलाकाराचा जीवनप्रवास या जीवनपटातून समोर येतो.
या चरित्रपटात वसंतरावांच्या जन्माआधीपासून ते उतारवयापर्यंतचं त्यांचं आयुष्य पाहायला मिळतं. एक असं आयुष्य ज्यात त्यांच गाणं त्यांची साथ शेवटपर्यंत सोडत नाही. लहानपणापासून आईने सांभाळ केलेल्या वसंतरावांच्या आयुष्यात अनेक गुरु आले. ते कसे आले, त्यांचा वसंतरावांच्या आयुष्यात कसा प्रभाव पडला, त्यांचं गाणं कसं समृद्ध होत गेलं हे चित्रपटातून पाहायला मिळतं. मास्टर दिनानाथ मंगेशकरांचे मोलाचे सल्ले, वसंतराव आणि पु. ल. देशपांडे यांची खास मैत्री, वसंतरावांना मिळालेली त्यांच्या आई आणि पत्निची साथ, त्यांची अजरामर खा साहेबांची भूमिका... या आणि अनेक गोष्टी या चित्रपटातून पाहायला मिळतात जे एक विलक्षण अनुभव देतात.
वसंतराव देशपांडे यांचा नातू गायक राहुल देशपांडे या चित्रपटात वसंतरावांची भूमिका साकारतोय. राहुलने आपल्या आजोबांना वाहिलेली ही श्रद्धांजली फार महत्त्वपूर्ण ठरतेय. एक सुप्रसिद्ध शास्त्रिय गायक म्हणून ओळख असलेला राहुल देशपांडे या चित्रपटातून एक उत्तम अभिनेता म्हणून समोर येतो. वसंतरावांच्या भूमिकेतील बारकावे सहस सुंदर पद्धतिने त्याने सादर केले आहेत. अभिनेत्री अनिता दातेने साकारलेली वसंतरावांच्या आईची भूमिका लक्षवेधी ठरते. अनिताने ही भूमिका चोख पार पाडलीय, शिवाय तिच्या भूमिकेतील संवाद पाहायला मजा येते. पु. ल. देशपांडेंच्या भूमिकेती पुष्कराज चिरपुटकरही या खास भूमिकेतून खळखळून हसवतो. हेच त्यांच्या कामाचं यश आहे. अमेय वाघने साकारलेली मास्टर दिनानाथ मंगेशकरांची भूमिका आणि त्याच्या वाट्याला आलेले तगडे संवाद लक्ष वेधून घेतात. ज्याला अमेयने योग्य न्याय दिलाय. सारंग साठ्ये, कुमुद मिश्रा, कौमुदी वालोळकर, दुर्गा जसराज , आलोक राजवाडे या आणि इतर कलाकारांची उत्तम साथ या चित्रपटाच्या कथेला मिळालीय. लावणी कलावंत शकुंतला नागरकर यांनी केलेल्या सीनचाही विशेष उल्लेख कारण हा सीनही अविस्मरणीय ठरतो. लहान वयातील आणि तरुण वसंतरावांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही छान काम केलय.
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तम साभांळली असून वसंतरावांचा जीवनप्रवास, त्यांच्याभोवती असलेली पात्रे, तो काळ पडद्यावर जिवंत केलाय. या चित्रपटातील सुरेल गाणी ही जणू गाण्याच्या मैफिलीचा अनुभवत देते. चित्रपटात एकूण 22 गाणी आहेत मात्र यात ठुमरी, भैरवी, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तीगीत, गझर असे विविध प्रकार ऐकायला मिळत असल्याने खास अनुभव मिळतो. राहुल देशपांडेचं संगीत आणि वैभव जोशी, मंगेश कांगणे, मयुरेश वाघ यांनी शब्दबद्ध केलेली आणि श्रेया घोषाल, उस्ताद रशीद खान, राहुल देशपांडे, आनंद भाटे, विजय कोपरकर, अंजली गायकवाड, प्रियांका बर्वे, सौरभ काडगांवकर, जिज्ञेश वझे आणि हिमानी कपूर यांच्या आवाजातील गाणी मनाला मंत्रमुग्ध करतात.
चित्रपटातील काही संवाद मन सुन्न करणार आहेत. अभिमन्यू डांगे यांचं छायांकनही छान झालय. संकलनात मात्र काही ठिकाणी त्रुटी जाणवतात. या जीवनपटातील विविध व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांचा उत्तम अभिनय, सुरेल गाणी आणि वादळी आयुष्य जगलेल्या वसंतरावांचा जीवनप्रवास लक्ष वेधून घेतात. 3 तासांचा हा चित्रपट कुठेही रेंगाळत राहत नाही तो शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवुन ठेवणारा आहे.
डॉ. वसंतराव देशपांडे या मनस्वी कलाकाराचा जीवनप्रवास पाहायचा असेल, रंगतदार सुरांची मैफिल अनुभवायची असेल तर हा चित्रपटात नक्की पाहा.