By  
on  

Sher Shivraj Review : छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र आणि कौशल्याची कुशलतेने मांडणी 

चित्रपट – शेर शिवराज
दिग्दर्शक – लेखक : दिग्पाल लांजेकर
कलाकार – चिन्मय मांडलेकर, दिग्पाल लांजेकर, मुकेश ऋषी अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, आस्ताद काळे, समीर धर्माधीकारी, माधवी निमकर, दीप्ती केतकर, मृण्मयी देशपांडे, विक्रम गायकवाड, ईशा केसकर, ज्ञानेश वाडेकर, सुश्रुत मंकणी, मंदार परळीकर, निखिल लांजेकर, 
रेटिंग – 3.5 मून्स

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौंर्याची आणि पराक्रमाची गाथा, त्यांचा इतिहास जनसामांन्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने घेतलाय. यातूनच शिवराज अष्टकची निर्मिती झाली आणि त्यातील चौथं पुष्प म्हणजे शेर शिवराज हा चित्रपट.
छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र आणि कौशल्यातील गनिमी कावा हा महत्त्वाचा भाग आहे. बलाढ्य शत्रूंशी सामना करताना जेव्हा लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य कमी पडले तेव्हा शिवरायांनी गनिमी कावाचे युद्धतंत्र अवलंबून शत्रूला जेरीस आणले. त्यापैकीच एक युद्ध म्हणजे अफझलखान वध. हिंदवी स्वराज्यावर मोठे संकट बनून आलेल्या क्रूरकर्मा अफझलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा कोथळा बाहेर काढून शिवरायांनी त्याचा वध केला. हा इतिहास सर्वश्रुत आहे. मात्र त्यामागे असलेली युद्धनिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाच्या वधाची योजना कशी आखली ? त्यामागील त्यांचं काय युद्धतंत्र होतं, याचा इतिहास शेर शिवराज या चित्रपटातून पाहायला मिळतोय.


‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या दिग्पाल लांजेकर यांच्या मागील चित्रपटातील काही कलाकार शेर शिवराज चित्रपटातही झळकतात. त्यात अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णीही पुन्हा एकदा राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत झळकत आहेत. 


‘पावनखिंड’ चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत झळकलेले अभिनेते अजय पुरकर या चित्रपटात पुन्हा एकदा मागील चित्रपटांप्रमाणे सुभेदार तानाजी मालुसरे साकारत आहेत. तर स्वत: दिग्पाल बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत झळकतोय. अफझलखानाच्या भूमिकेत बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी झळकतायत. यासोबतच अभिनेता विक्रम गायकवाड – सरनोबत नेताजी पालकर, दीप्ती केतकर – मातोत्री दिपाऊ बांदल, मृण्मयी देशपांडे – केसर, कृष्णाजी भास्कर – ज्ञानेश वाडेकर, वैभव मांगले – गोपीनाथ बोकील, सुश्रुत मंकणी – येसाजी कंक, मंदार परळीकर – सरदार कृष्णाजी बंककर, समीर धर्माधिकारी – कान्होजीराव जेधे, निखिल लांजेकर – नरवीर जीवा महाले, अस्ताद काळे – विश्वास दिघे, अक्षय वाघमारे – पिलाजी गोळे, ईशा केसकर – महाराणी सईबाई, ऋषी सक्सेना – फाजलखान या आणि इतर कलाकारांनी अशा वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून अभिनेता चिन्मय माडलेकरने प्रेक्षकांची मनं जिंकलेली असताना या चित्रपटातून शिवरायांचं युद्धतंत्र, चातुर्य, संघटन या गोष्टी अभिनयातून उत्तम सादर केल्या आहेत. चिन्मयचे उत्तम संवादफेक आणि भाषेवरची पकड यामुळे शिवरायांची भूमिका त्याने पुन्हा एकदा चोख बजावली आहे. शिवराज अष्टकातील प्रत्येक चित्रपटातून राजमाता जिजाऊंच्या विविध छटा पाहायला मिळतायत. जिजाऊंची शिवरायांना दिलेली शिकवण आणि शिवरायांना विविध गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता या चित्रपटातून समोर येतात. ज्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सहज सुंदर साकारल्या आहेत. जिजाऊंची माया, प्रोत्साहन, मार्गदर्शन या छटा त्यांनी उत्तम साकारल्या आहेत. 


अफझलखानाच्या भूमिकेत मुकेश ऋषी यांची योग्य निवड जाणवते. त्यांचा भारदस्त आवाज, शरीरयष्ठी, संवादकौशल्य अफझलखानाच्या भूमिकेत चोख बसलय. दिग्पाल लांजेकर यांनी स्वत: साकारलेली बहिर्जी नाईक यांची भूमिका लक्षवेधी ठरतोय. गोपीनाथ बोकील यांच्या भूमिकेतून अभिनेते वैभव मांगले उत्तम विनोदी छटा उमटवतात. विश्वास दिघेच्या भूमिकेतून अस्ताद काळे लक्ष वेधून घेतोय. महाराणी सईबाईंच्या भूमिकेतून ईशा केसकरचं कामही चांगलं झालय. मातोत्री दिपाऊ बांदल यांच्या भूमिकेतील दीप्ती केतकरनेही छान काम केलय.


या चित्रपटाचे संवादलेखन ही जमेची बाजू आहे. काही ठिकाणी पार्श्व संगीताने काही सीन अक्षरक्षह: जिवंत केलेत. 


या चित्रपटाचा मुळ विषय स्वारी अफझलखान असल्याने संपूर्ण चित्रपटभर त्या क्षणाची उत्सुकता लागते. अर्थात हा सीन मोठ्या कालावधीनंतर समोर येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखान वधाचा सीन कमी कालावधीतच परिणामकारक वाटतो. काही ठिकाणी चित्रपटातील सीन्सचा कालावधी लांबल्याचे जाणवते. तर कमकुवत व्हीएफएक्स डोळ्याला खटकतात आणि त्याचा प्रभाव पडत नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. चित्रपटाचे संकलनही काही बाबतीत कमी पडल्याचे जाणवते. 
रेशमी सरकार यांचे छायांकन चित्रपटाच्या कथेत जीव ओततात. या चित्रपटातील काही सीन हे प्रतापगडावर चित्रीत करण्यात आलेत. हे सीन तो काळ पडद्यावर तर जिवंत करतात. देवदत्त बाजीच्या संगीताने चित्रपटात रंगत आणलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र आणि त्यातील बारकावे दिग्पालने या चित्रपटात उत्तम मांडलेत. तेव्हा हा शिवकालीन इतिहास शेर शिवराज चित्रपटातून जरुर पाहावा असा आहे. 


 

Recommended

PeepingMoon Exclusive