By  
on  

Ekda Kay Jhala Review - बाप-लेकाची हदयस्पर्शी गोष्ट ‘एकदा काय झालं’!

सिनेमा – एकदा काय झालं  
कथा-पटकथा- दिग्दर्शन आणि संगीत  – डॉ. सलील कुसकर्णी 
कलाकार – सुमित राघवन , बालकलाकार अर्जुन पूर्णपात्रे, उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री आणि मुक्ता बर्वे 
कालावधी – २ तास 
रेटिंग – ३  मून्स

गोष्ट तुमची असते गोष्ट माझी असते गोष्ट आपल्या प्रत्येकाची असते. एकूणच गोष्टीच्या जगात आपण वावरत असतो. आपल्या अवती-भोवती जे घडतं ती गोष्टच तर असते. आजच्या शाळकरी मुलांचं माहित नाही, पण आपण लहानपणी किंवा मोठे झालो तरी आई-बाबा, आजी-आजोबा, मावशी, काका-काकू या प्रत्येकाकडून गोष्टींचा खजिना नक्कीच मिळवला असणार. मग त्या गोष्टी पौराणिक असू  दे किंवा मग इसापनितीतल्या, जंगलातल्या, गावातल्या   किंवा ख-याखु-या कुठल्याही असो त्या ऐकण्यातून आपल्याला मिळणारा आनंद आणि गोष्टीतून योग्य बोध किंवा तात्पर्य मुलांपर्यंत पोहचवण्याचं  मोठ्यांना मिळालेलं समाधान अवर्णनीय. 

आज मोबाईल, आयपॅड, मॅकबुक आणि नेटफ्लिक्सच्या जगात आपली मुलं गोष्ट खरंच ऐकतात का किंवा लिहायचा प्रयत्न करतात, त्यांना गोष्टींमध्ये किती स्वारस्य आहे  हा खरं तर संशोधनाचा विषय आहे, म्हणूनच ‘एकदा काय झालं’ च्या चिंतनची आणि त्याच्या बाबाची गोष्ट खास ठरते. 
एखाद्या गोष्टीप्रमाणेच सिनेमाचं कथानक पडद्यावर साकार होतं. ही गोष्ट आहे एखाद्या  कुठल्याश्या गावातील सधन कुटुंबात रहाणा-या चिंतनची (बालकलाकार अर्जुन पूर्णपात्रेची).आई-बाबा आणि आजी-आजोंबासोबत तो रहात असतो. त्याचे बाबा किरण (सुमित राघवन)  हे एका शाळेत शिक्षक आहेत. पण ही शाळा आपल्यासारखी नाही, गोष्टींनी भरलेली आहे. इथे मुलांना गोष्टींतूनच शिक्षण मिळतं. ह्या गोष्टी सांगणा-या शाळेचं नाव आहे,नंदनवन. ही चिंतनच्या कुटुंबाचीच शाळा आहे. गोष्टी सांगणारा अवलिया अशीच चिंतनच्या बाबाची ओळख आहे. तर त्याची आई श्रृती (उर्मिला कोठारे )ही एक डॉक्टर असते. आजोबा ( मोहन आगाशे ), आजी ( सुहास जोशी ) यांच्यासोबत चिंतन मजेत रहात असला तरी तो त्याच्या बाबाची सावली आहे. त्याची प्रत्येक गोष्ट ही बाबासारखीच आहे. त्याला मोठं होऊन बाबासारखंच व्हायचंय. गोष्टी सांगायच्यात गोष्टीचं नाटक बसवायचंय आणि त्या नाटकात त्याचा बाबा काम करणार हे त्याने ठरवून टाकलंय. 

चिंतनचा बाबा दर महिन्याच्या १ तारखेला मुलांना सोबत घेऊन एक गोष्ट सादर करतो. त्यात मुलं उत्साहाने भाग तर घेतातच पण त्यातलं तात्पर्यसुध्दा त्यांना नीट गवसतं.  म्हणूच मुलांसाठी त्यांना गोष्टी सादर करण्यासाठी एक भव्य एम्पी थिएटर असावं असं चिंतनच्या बाबांचं स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी ते सतत धडपडत असतात. पण म्हणतात ना काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तसंच काहीसं या चिंतनच्या गोष्टीत घडतं. अचानक चिंतनच्या बाबाचं गोष्टी सांगणं कमी होतं, चिंतनलासुध्दा ते वेळ देण्यात कमी पडतात. सगळं सुरळीत सुरु असतानाच या गोष्टींच्या जगात एक वास्तवाचा कवड्सा हळूच डोकावतो. काय सुरु आहे, हे चिंतनलाच कळत नाही. तो या सगळ्यापासून अनभिज्ञ राहतो का, पुढे नेमकं काय घडणार, चिंतनच्या बाबाचं एम्पी थिएटरचं  स्वप्नं पूर्ण होणार का, दोघंही गोष्टींच्या जगात पुन्हा रममाण होणार का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. 

 

 

दिग्दर्शन 

 दिग्दर्शक सलील कुलकर्णींचा हा सिनेमा काळजाला भिडतो. फारच हदयस्पर्शी अशी सिनेमाची मांडणी त्यांनी केली आहे. . एखाद्या गोष्टीतल्या गावासारखंच हे कथानक घडताना पाहायला मिळंतं. बाप-लेकाची तगमग, त्यांच्यातला दुरावा हे सगळे बारकावे त्यांनी अचूक टिपले आहेत. गोष्ट सांगणा-या माणसाची एक अनोखी गोष्ट त्यांनी मांडलीय याबद्दल त्यांचं कौतुक व्हायलाच हवं. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शनाचा हा दुसराच प्रयत्न आहे, हे अजिबात जाणवत नाही. 

 

अभिनय 
सुमित राघवन, मोहन आगाशे, सुहास जोशी, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री यांसारखे सगळ्याच मातब्बर कलाकारांनी आपापल्या भूमिका नेहमीप्रमाणेच चोख बजावल्यात. पण विशेष कौतुक आहे ते बच्चेकंपनींचं. हा सिनेमा त्यांचासुध्दा आहे. चिंतनच्या भूमिकेतील बालकलाकार अर्जुन पूर्णपात्रेचं कौतुक करावं तितकं कमी आहे. निरागस अभिनयातून तो लक्षात राहिलाय. इतर सगळ्याच बालकलाकारांनी सुंदर भूमिका सकारल्या आहेत. 

 

संगीत
सलील कुलकर्णींच्या सिनेमातील संगीताबद्दल काय बोलायचं, एक म्युझिकल ट्रिटचं असते. थांब ना रे क्षणा ...हे शंकर महादेवन यांच्या स्वरसाज चढलेलं गाणं सिनेमा पाहून आल्यावरही तुमच्या ओठांवर रेगांळतं. तर सुनिधी चौहानने गायलेली अंगाईसुध्दा कथानकाशी एकरुप झालीय. 

सिनेमा का पाहावा

गोष्टींच्या जगात रममाण होण्यासाठी आणि एका बाप-लेकाची अनोखी गोष्ट जाणून घेण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा सिनेमा नक्की पाहावा. मनोरंजनासोबतच हा सिनेमा खुप काही देऊन जतो, सिनेमागृहातून बाहेर पडताना तुम्हाला ते नक्की जाणवेल.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive