सिनेमा : सिंबा
दिग्दर्शक : रोहित शेट्टी
कलाकार : रणवीर सिंह, सारा अली खान, सोनू सूद, सिध्दार्थ जाधव, आशुतोष राणा, वैदही परशुरामी, विजय पाटकर, अश्विनी काळसेकर, सौरभ गोखले, सुचित्रा बांदेकर
रेटींग : ४ मून
रोहित शेट्टीचे सिनेमे म्हणजे अॅक्शन, ड्रामा आणि प्रेम असं मनोरंजनाचं खच्चून भरलेलं पॅकेज. सिनेमागृहात जाऊन फक्त तीन तास आपलं कामाचं आणि इतर सर्वच टेन्शन विसरुन सिनेमा मनोसोक्त एन्जॉय करायचा याची 100 टक्के गॅरण्टी असते. असाच त्याचा सिंबासुध्दा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. एका डॅशिंग पोलिसाची हटके कथा या सिनेमात पाहायला मिळणार हे यापूर्वी ट्रेलरमधूनच स्पष्ट झालं होतं. पण एनर्जीमॅन रणवीर सिंह यात सुपरकॉपच्या भूमिकेत असल्याने आणि त्याच्यासोबत साराची केमिस्ट्री पाहायला मिळणार यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे.
कथानक सिंबाचं कथानक म्हणाल तर अगदीच घासून गुळगुळीत झाल्यासारखं असलं तरी रोहित शेट्टीने मात्र त्याला सोन्याचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला आहे. इन्स्पेक्टर संग्राम भालेराव उर्फ सिंबा (रणवीर सिंह) हा गोव्यातील भ्रष्ट पोलिस असतो. थोडासा रागीट, धम्माल आणि मजा-मस्तीत आयुष्य जगणारा या सिंबाचा भ्रष्ट ते प्रामाणिक पोलिसाचा प्रवास सिनेमात पाहता येणार आहे. सिंबाच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार होतो आणि मग सुरु होतो अन्याविरोधातील लढा. यात त्याच्या वाटेत येणारे आणि त्याला साथ देणारे यांच्यासह तो कसा घडतो आणि काय नाट्मय घडामोडींनी सिनेमा पुढचं वळण घेते हे प्रत्यक्ष तुम्हाला पडद्यावर पाहावं लागेल.
दिग्दर्शन रोहित शेट्टीने सिंबाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडली आहे. एक चांगला मसालापट सिनेमा निर्माण करण्यासाठी जे काही कसब लागतं ते रोहितमध्ये आहे. त्यामुळेच सिंबाला स्पायसी टच देण्यात तो कुठेही कमी पडलेला नाही. विशेष म्हणजे कलाकाराकडून काम कसं करवून घ्यायचं हे कसब रोहित शेट्टीला ठावूक असल्याने त्याच्या पुरेपूर फायदा त्याने करवून घेतला आहे. या सिनेमातील गाण्यांमध्ये गोलमालच्या कलाकारांचा आणि अक्षयचा कॅमिओ दाखवून आगामी प्रोजेक्टचं सुतोवाचही केलं आहे.
अभिनय या सिनेमातील कलाकारांनी अभिनयकौशल्याने सिनेमाला चार चांद लावले आहेत. यात प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम निभावली असली तरी रणवीर सगळ्याहून वरचढ ठरतो. त्याने रंगवलेला संग्राम भालेरावने अॅक्शन, इमोशन, रोमान्स या प्रत्येक प्रकारात स्वत:ला उत्तम प्रकारे सादर केलं आहे.बहिणीवर झालेल्या अत्याचारामुळे पेटून उठणारा सिंबा प्रत्येकालाच भावतो. रणवीरला पोलिस लूक खुपच शोभून दिसत आहे. साराने तिच्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम वठवली आहे. सिद्धार्थ आणि वैदेही त्यांच्या त्यांच्या व्यक्तिरेखेत भाव खाऊन जातात.
सिनेमा का पाहावा? दिग्दर्शक रोहित शेट्टीने सिनेमाची भट्टी मस्त जमवली आहे. संगीत, दिग्दर्शन, अभिनय, कथा, अॅक्शन, रोमान्स, हे सगळं योग्य प्रमाणात जमून आल्याने कथेचा कमकुवतपणा लपून जातो. हा सिनेमा तुम्हाला ताण विसरायला लावेल यात शंका नाही. त्यामुळे सिंबा संपूर्ण कुटुंबासोबत आवर्जून पहायलाच हवा.